पुणे : राज्यात हवामानाचे हेलकावे; किमान तापमानात उच्चांकी वाढ

पुणे : हिवाळ्याच्या हंगामात ऐन डिसेंबरमध्ये गुलाबी थंडीची अनुभूती घेण्याचा कालावधी असताना राज्याच्या सर्वच भागांत सध्या रात्रीचे किमान तापमान एकदमच उच्चांकी पातळीवर वाढले आहे. त्यामुळे थंडीऐवजी उकाड्याचा अनुभव मिळतो आहे. हवामानाचे हे हेलकावे आणि तापमानवाढ आणखी दोन-तीन दिवस कायम राहणार आहे. या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यताही कायम राहण्याचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ आणि त्यानंतर कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम महाराष्ट्रातील थंडीवर झाला आहे. कमी दाबाच्या क्षेत्राची प्रणाली आता अरबी समुद्रात आणि किनारपट्टीवर आहे. केरळ आणि परिसरात वाऱ्यांची चक्रीय स्थिती आहे. त्याचा परिणाम म्हणून कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत रविवारीही हलका पाऊस झाला. या भागामध्ये दुपारनंतर आकाश ढगाळ होत आहे. रात्री ढगाळ वातावरण असल्याने किमान तापमानात एकदमच मोठी आणि विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळे रात्रीचा गारवा पुन्हा गायब झाला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि कोकणात हलक्या पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, औरंगाबाद, जालना, बीड, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांमध्ये १३ डिसेंबरला हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतरही दोन दिवस महाराष्ट्रात बहुतांश भागांत ढगाळ स्थिती राहणार आहे. त्यामुळे तापमानातील वाढ कायम राहील. तीन दिवसांनंतर मात्र राज्यातील किमान तापमानात २ ते ४ अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

उच्चांकी ८ ते १० अंशांनी तापमानवाढ

डिसेंबरमध्ये सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात बहुतांश भागात १० ते १२ अंशांवर किमान तापमान नोंदविले जाते. काही भागांत या कालावधीत दहा अंशांखाली पारा असतो. मात्र, सध्या राज्याच्या सर्वच भागांत रात्रीच्या किमान तापमानाचा पारा २० अंशांपार गेला आहे. सरासरीच्या तुलनेत तापमानातील ही वाढ तब्बल ८ ते १० अंशांनी अधिक आणि उच्चांकी आहे. विदर्भात सध्या तापमानाबाबत सर्वाधिक विचित्र स्थिती आहे. वाशिम येथे राज्यातील नीचांकी १३.० अंश किमान तापमान असताना इतर सर्व भागांत २१ अंशांवर तापमान आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ येथे सोमवारी दिवसाचे कमाल तापमान तब्बल ३८.५ अंश नोंदविले गेले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply