पुणे : राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात आज पुणे बंद; पोलिसांचा मोठा फौजफाटा

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकर समितीच्या वतीने या बंदचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, संभाजी ब्रिगेड आणि इतर काही संघटनांनी आज पुणे बंदची हाक दिली आहे. 

पुण्यातील व्यापारी संघटना फेडरेशन ऑफ ट्रेडर्स असोसिएशन ऑफ पुणे (FATP) चे अध्यक्ष फतेहचंद रांका यांनी आजच्या 'बंद'ला पाठिंबा देण्याचा आणि दुपारी 3 वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.या बंद दरम्यान संपूर्ण शहरात सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी सुमारे 100 वरिष्ठ अधिकारी, 1000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून तर लाल महाल पर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. आज सकाळी 9.30 वाजता डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मूकमोर्चास प्रारंभ होणार आहे. मोर्चाची सांगता झाल्यानंतर जाहीर सभाही होणार आहे. खासदार, उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजी राजे, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सुमारे साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

मोर्च्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहर पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या,गृहरक्षक दलाचे जवान यांच्यासह स्थानिक पोलीस ठाणे, गुन्हे शाखेची पथक तैनात करण्यात आला आहे. तसेच कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply