पुणे : यंदाचा ऊस हंगाम ३१ मेपर्यंत चालणार; साखर आयुक्तांची माहिती

पुणे : राज्यात अतिरिक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी साखर कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील गाळप संपले तरी त्यांनी परिसरातील उसाचे गाळप करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील गाळप हंगाम जास्तीत जास्त ३१ मेअखेरपर्यंत सुरू राहील, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. राज्यात यंदा सुमारे एक हजार २५० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होइल, असा साखर आयुक्तालयाचा अंदाज आहे. त्यापैकी सुमारे एक हजार ५५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. मराठवाड्यात साधारणत: १० लाख टन उसाचे उत्पादन होते. यावर्षी गाळप सुमारे १२.५० लाख टनांपर्यंत जाऊ शकते. ‘‘सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस संपत आला आहे. परंतु उस्मानाबाद जिल्ह्यात ऊस मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिरिक्त ऊस सोलापूरच्या साखर कारखान्यांकडून गाळपासाठी नेला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. परंतु सांगली, तासगाव, वाळवा कार्यक्षेत्रातील अतिरिक्त ऊस कोल्हापूरच्या कारखान्यांकडून गाळपासाठी नेला जात आहे. जालना येथील अतिरिक्त ऊस अंबड आणि इतर कारखाने घेत आहेत. गाळप संपलेल्या कारखान्यांनी सुमारे ५० किलोमीटरच्या परिसरातील ऊस गाळपासाठी घेण्यास हरकत नाही. शेवटचे १५ साखर कारखान्यांमध्ये हंगाम ३१ मेपर्यंत सुरू राहील,’’ असे साखर आयुक्त गायकवाड यांनी स्पष्ट केले. सोलापुरातील कारखाने मराठवाड्यातून जादा ऊस घेतील. जालना, उस्मानाबाद आणि परभणीतील पाथरी येथे उसाचे उत्पादन वाढले आहे. उसाचे पीक शेतात राहू नये, यासाठी साखर आयुक्तालय आणि कारखान्यांकडून पावले उचलली जात आहेत. - जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष- राष्ट्रीय राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply