पुणे : मुळा-मुठा नदीकाठ पुनरुज्जीवन योजना ‘गाळात’; पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेची संयुक्त निविदा रद्द

पुणे : स्थगिती आदेशाच्या कचाट्यात अडकलेली भारतीय जनता पक्षाची महत्त्वाकांक्षी मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजना अडचणीत सापडली आहे. औंध, बाणेर आणि बालेवाडी येथील तिसऱ्या टप्प्यातील कामांची निविदा प्रक्रिया महापालिकेकडून रद्द करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मदतीने ही कामे करण्याचे प्रस्तावित होते. मात्र महापालिकेला ही कामे क्रेडीट नोटवर करायची आहेत. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने काम रोख मोबदल्याने देण्याचे निश्चित केले आहे. या अडचणीमुळे संयुक्त निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

साबरमती नदीच्या धर्तीवर मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजना महापालिकेने हाती घेतली आहे. ही योजना पूर हमी योजना असून नदीची वहन क्षमता कमी होण्याबरोबरच नदीकाठच्या शेकडो हेक्टर जमिनीचे निवासीकरण होणार आहे, असा आक्षेप नोंदवित पर्यावरणप्रेमींनी योजनेला विरोध केला होता. मात्र भारतीय जनता पक्षाची महत्त्वाकांक्षी योजना असल्याने ती दामटण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.

योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात मुळा नदीच्या सुमारे आठ किलोमीटर लांबीच्या काठाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. मुळा नदी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिकेच्या सीमेवरून वाहत असून औंध, बाणेर आणि बालेवाडी हा भाग नदीकाठी आहे. तिसऱ्या टप्प्यातील कामांचा आर्थिक आराखडा दोन्ही महापालिकांनी तयार केला होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेने निधी देण्याची तयारी दर्शविली असून कामांबाबतची निविदा प्रक्रिया राबविण्याचे नियोजन सुरू झाल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. त्यासाठी सहाशे कोटींच्या खर्चाचा आराखडा करण्यात आला होता. यातील निम्मा निधी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून देण्याचे मान्य करण्यात आले होते.

महापालिकेने शहराच्या हद्दीतील कामे क्रेडीट नोट देऊन करण्याचे प्रस्तावित केले आहे. कामाच्या बदल्यात विकसकाला क्रेडीट नोट दिली जाणार आहे. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेला रोख मोबदला देऊन कामे करायची आहेत. त्यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिकेबरोबर चर्चा करण्यात आली. मात्र त्यांना हा पर्याय अमान्य असल्याने निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. पुणे महापालिका त्यांच्या स्तरावर पुन्हा निविदा प्रक्रिया राबविणार आहे. योजनेची कामे येत्या काही दिवसांत सुरू होतील,असे अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

साबरमती नदीच्या धर्तीवर मुळा-मुठा नदीकाठाचे पुनरुज्जीवन, संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याचे नियोजित आहे. त्याअंतर्गत एकूण ४४ किलोमीटर लांबीचा नदीकाठ सुशोभित होणार आहे. नदीचे खोलीकरण, नदीकाठी उद्याने, छोटी मैदाने, जॉगींग ट्रॅक, सायकल मार्ग, विरंगुळा केंद्र अशी कामे याअंतर्गत प्रस्तावित असून पहिल्या टप्प्यात संगमवाडी ते बंडगार्डन या दरम्यानच्या नदीकाठाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात बंडगार्डन ते मुंढवा हा सात किलोमीटर लांबीचा नदीकाठ सार्वजनिक खासगी लोकसहभागातून विकसित केला जाईल.

बंडगार्डन ते संगम पूल या दरम्यान ३६२ कोटींची कामे करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या स्तरावर ही कामे होणार असून सुशोभीकरण, सायकल मार्गाची उभारणी, संगमघाट परिसरातील पुरातन वास्तूंना धक्का न लावता सुशोभीकरण, सीमाभिंती, ताडीवाला रस्ता परिसरात संरक्षक भिंती, विविध देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड, नदीपातळीची खोली वाढविणे अशी विविध कामे या टप्प्यात होतील.

मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन आणि पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत ४ हजार ७२७ कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. त्याबाबतचा आराखडा महापालिकेकडून करण्यात आला असून पहिल्या तीन टप्प्यांची कामे करण्यास महापालिकेच्या मुख्य सभेनेही मान्यता दिली आहे. यातील पहिल्या टप्प्यातील कामांसाठी महापालिका सातशे कोटी रुपयांचा निधी देणार असून उर्वरित दोन टप्पे सार्वजनिक खासगी लोकसहभागातून (पीपीपी) राबविण्यात येणार आहेत. संगमवाडी ते बंडगार्डन या साधारण चार किलोमीटर लांबीच्या अंतराची कामे हाती घेण्यात आली आहेत. पुढील अडीच वर्षांत ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यानंतर सार्वजनिक खासगी लोकसहभागातून पुढील टप्पा राबविण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील कामांना औंध, बाणेर, बालेवाडीपासून सुरुवात होणार आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply