पुणे : मुख्यमंत्र्यांसारखी वेशभूषा करणाऱ्या तोतयाच्या विरोधात गुन्हा दाखल; समाज माध्यमावर छायाचित्र प्रसारित

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा करणाऱ्या तोतयाच्या विरोधात खंडणी विरोधी पथकाकडून गुन्हा दाखल करण्यात आला. तोतयाने मुळशीतील गुंड शरद मोहोळ याच्याबरोबर समाज माध्यमावर छायाचित्र प्रसारित केल्याचे उघडकीस आले आहे. विजय नंदकुमार माने (रा. आंबेगाव) असे गुन्हा दाखल केलेल्या तोतयाचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी फिर्याद दिली असून माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी सोमवारी सकाळी बंडगार्डन परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी समाज माध्यमावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा करून मुळशीतील गुंड शरद मोहोळ याच्याबरोबर समाज माध्यमावर छायाचित्र प्रसारित झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी छायाचित्राची बारकाईने तपासणी केली, तेव्हा छायाचित्र प्रसारित करणाऱ्याचे नाव विजय माने असल्याचे समजले. माने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासारखी वेशभूषा करून सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यक्रमात वावरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर माने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांपूर्वी माने याने समाज माध्यमावर ध्वनिचित्रफीत प्रसारित केली होती. या ध्वनिचित्रफितीत काही महिला माने याच्यासमोर नृत्य करत असल्याचे आढळून आले होते. माने जाणीवपूर्वक दिशाभूल करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे तपास करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply