पुणे : मार्केट यार्ड परिसरात भरदिवसा गोळीबार करुन 28 लाखाची रोकड लुटणाऱ्यांना 7 जणांना बेड्या

पुणे : शहरात शनिवारी पहाटे मार्केट यार्ड परिसरात अंगडीयाच्या कार्यालयात भरदिवसा घुसून गोळीबार करीत 28 लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या चोरट्यांना पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अवघ्या दोन दिवसातच बेड्या ठोकल्या. हि घटना शनिवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड येथे घडली होती. पोलिसांनी आरोपींकडून 11 लाखाची रोकड, तीन दुचाकी, मोबाईल असा 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अविनाश उर्फ सनी रामप्रताप गुप्ता ( वय 20, मंगळवार पेठ), आदित्य अशोक मारणे (वय २८, रा. रामनगर,वारजे), दिपक ओम प्रकाश शर्मा ( वय १९, राहुलनगर, शिवणे), विशाल सतीश ( वय २०, मंगळवार पेठ), अजय बापू दिवटे ( वय २३, श्रीराम चौक, वारजे), गुरुजनसिंह सेवासिंह विरक (वय २२, वर्षे,शिवाजीनगर), निलेश बाळू (वय २०, एस. आर. ए. स्कीम, मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड येथील गेट नंबर दोन येथे गणराज मार्केट नावाची इमारत आहे. संबंधित इमारतीमध्येच द प्रोफेशनल कुरिअर नावाने अंगडीयाचा व्यावसाय चालतो. तर इमारतीच्या पाठीमागील बाजुस असलेल्या पोटमाळावजा जागेत त्याचे कार्यालय आहे. येथे शनिवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास अंगडीयाच्या कार्यालयात दोन कर्मचारी उपस्थित होते. ते काचेच्या केबिनमध्ये बसून त्यांचे नियमीत काम करीत होते.त्यावेळी एक व्यक्ती तेथे आला, त्यानंतर तो थेट कर्मचारी काम करीत असलेल्या काचेच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करु लागला.

यातील एका कर्मचाऱ्याने त्यास धक्का देऊन बाहेर काढत दार लावून घेतले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने कोयता काढून केबिनची काच फोडली. तर त्याच्या मागून आलेल्या दुसऱ्या व्यक्तीने थेट पिस्तूल काढून जमिनीवर गोळी झाडली. त्यापैकी एकाने केबिनमध्ये घुसून तेथील रोकड बाहेरील व्यक्तीकडे दिली. त्यांनी रोकड पिशवीमध्ये भरुन तेथून पळ काढला. दरम्यान, इमारतीच्या बाहेर त्यांनी त्यांचे तीन साथीदार थांबविले होते. दरोडा टाकल्यानंतर पाचही जणांनी धावत जाऊन पुढे थांबलेल्या दोन दुचाकींवरुन पळ काढला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अतिरीक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त पौर्णिमा तावरे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित कार्यालय व रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण थाब्यात घेतले. त्यामध्ये दरोडेखोर दुचाकीवरुन शिवनेरी रस्त्याने पुणे सातारा रस्त्याच्या दिशेने गेल्याचे चित्रीकरणात दिसून आले होते. त्यादृष्टीने पोलिसांनी तांत्रिक तपास केला. त्यामध्ये आरोपी मावल तालुक्यातील मोर्वेगाव येथील साई फार्म हाऊस येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अधिक तपास करून आरोपींना बेड्या ठोकल्या. हि कारवाई खंडणी विरोध वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलिस कर्मचारी मधुकर पसीदर, सयाजी चव्हाण, प्रमोद सोनवणे, संजय भापकर, हेमा देये, नितीन ठवरे, दुर्योधन गुरव, अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, संभाजी गंगावणे यांच्या पथकाने केली आहे.

"या गुन्ह्यातील दोन आरोपी मोका लावलेला आहे, त्यामध्ये ते फरारी होते. आरोपी कारागृहात असतानाच त्यांनी दरोडा टाकण्याचा कट रचला. त्यानंतर त्यांनी हा गुन्हा केला. पोलिसांनी सात जणांना दोन दिवसातच त्यांना अटक केली. आणखी 4 ते 5 जण फरारी आहेत." अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply