पुणे : बेकायदा मद्यविक्रीवर कारवाई, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वर्षभरात १२ कोटींचा मुद्देमाल जप्त, २००६ आरोपींना अटक

पुणे : बेकायदा मद्यविक्री, वाहतूक आणि उत्पादन करणाऱ्यांवर गेल्या वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विक्रमी कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरात संबंधितांवर १८७० गुन्हे दाखल केले असून २००६ आरोपींना अटक केली आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा उत्पादन शुल्क विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यामध्ये ही बाब समोर आली आहे. मद्याची अवैध निर्मिती, वाहतूक आणि विक्री यावर उत्पादन शुल्क विभागाने विक्रमी कारवाया केल्या आहेत. या कारवाईत १८७० गुन्हे दाखल करण्यात आले असून २००६ आरोपींना अटक करण्यात आली आहेत. २०० पेक्षा जास्त चारचाकी आणि दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच या कारवायांमधून १२ कोटी २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली.

गेल्या वर्षभरात बेकायदा मद्यविक्री, वाहतूक आणि उत्पादन केल्याप्रकरणी १५३८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच १५६८ आरोपींना अटक करण्यात आली होती. या कारवायांमधून सात कोटी ९१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात गेल्या वर्षीपेक्षा यंदा पाच कोटी रुपयांचा अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश मिळाले आहे, असेही राजपूत यांनी सांगितले.

परराज्यातील जप्त केलेले मद्य ३३ हजार ८०७.३९ बॅरल, तर गावठी देशी, विदेशी आणि बिअर, अशा एकूण २२ हजार २००.८९ बॅरल मद्यसाठा जप्त केला आहे. तसेच चालू वर्षात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या ६८ आणि ८४ कलमान्वये एकूण २६ गुन्हे नोंदविण्यात आले असून, त्यामध्ये ८४ आरोपींना न्यायालयाने एक लाख ७४ हजार ३०० रुपयांच्या दंडाबरोबर शिक्षा सुनावली आहे, असेही अधीक्षक राजपूत यांनी सांगितले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मंगळवार पेठ, तळेगाव दाभाडे, ताडीवाला रस्ता, पिंपरी-चिंचवड, नारायण गाव आणि सासवड येथे गोदामे आहेत. या गोदामांत कारवायांत जप्त केलेली वाहने, मद्यसाठा, उत्पादनासाठी लागणारे साहित्य असा मुद्देमाल ठेवला जातो. न्यायालयाच्या आदेशानुसार हा जप्त केलेला मद्यसाठा आणि उत्पादन साहित्य नष्ट केले जाते, असेही अधीक्षक राजपूत यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply