पुणे : बालाजीनगरमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

पुणे - बालाजीनगर परिसरातील एका तरुणाला जबर मारहाण करीत, त्यास पाया पडायला लावून त्याचे व्हिडीओ प्रसारीत करणाऱ्या टोळीतील  सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या युनीट दोनच्या पथकाने अटक केली. यापुर्वी सहकारनगर पोलिसांनी काही गुन्हेगारांना यापुर्वी अटक केली आहे.

सल्ल्या ऊर्फ सलमान हनिफ शेख (वय 22, रा.रजनी कॉर्नर, बालाजी नगर, धनकवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सल्ल्या शेख त्याचे साथीदार आदेश बिरामणी,आपान शेख, सौरभ भगत, सॅंडी ऊर्फ संदिप शेंडकर, सुफीयान व त्यांच्या तीन ते चार साथीदारांनी एका तरुणास "तु पुर्वी आमच्या गॅंग सोबत राहात होतास, आता का राहात नाहीस' अशी धमकी देत त्यास लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. तसेच त्यास मारहाण करीत, गुडघ्यावर बसवून गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आपान शेख याने हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत केला. या घटनेनंतर आरोपींनी हातामध्ये तलवार, कोयते, लोखंडी सळई घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. त्याचेही चित्रीकरण करुन तो व्हिडीओ समाजामध्यमांवर प्रसारीत केला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. या घटनेने सहकार नगर पोलिसही खडबडुन जागे झाले.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन तत्काळ या घटनेतील काही आरोपींना अटक केली. दरम्यान, या घटनेतील मुख्य आरोपी सलमान शेख हा घटना घडल्यापासून पसार झाला होता. दरम्यान, सलमान शेख हा आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी-कळस येथील एका हॉटेलसमोर येणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने तेथे सापळा रचून शेखचा शोध घेतला. त्यावेळी त्याने पोलिसांना पाहून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यास शिताफीने अटक केली. त्यानंतर त्यास पुढील कारवाईसाठी सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. शेखविरुद्ध खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत,दंगा, मारामारी असे विविध प्रकारचे 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सहायक पोलिस उपनिरीक्षक यशवंत आंब्रे, पोलिस कर्मचारी कादीर शेख, समीर पटेल, साधना ताम्हाणे,नागनाथ राख यांच्या पथकाने हि कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply