पुणे : प्रेम प्रकरणातून खून; युवती अटकेत

पुणे : वारजे भागात प्रेमप्रकरणातून झालेल्या खून प्रकरणाच्या कटात एक युवती देखील सामील असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. तिला वारजे पोलिसांनी अटक केली आहे. प्राजक्ता विजय पायगुडे (वय १९, रा. दांगट पाटीलनगर, शिवणे) असे अटक करण्यात आलेल्या युवतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रद्युन्य कांबळे आणि प्राजक्ता पायगुडेचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधास तिच्या कुटुंबीयांचा विरोध होता. १६ मार्च रोजी कांबळे तिला भेटायला शिवणे परिसरात गेला होता. त्यावेळी प्राजक्ताचे वडील विजय, आई वंदना, भाऊ अजय, साथीदार सागर राठोड यांनी कांबळेवर शस्त्राने वार केले तसेच त्याला गजाने बेदम मारहाण केली. मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात प्राजक्ताचे वडील, आई, भाऊ तसेच साथीदारास अटक करण्यात आली होती. खून प्रकरणाच्या कटात ती सामील असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर वारजे पोलिसांनी तिला अटक केली, अशी माहिती वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी दिली. सहाय्यक पोलीस आयुक्त रुख्मिणी गलांडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.  


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *