पुणे प्रशासन ‘भुयारा’तून मार्गावर!

पुणे - पादचारी भुयारी मार्गांची  दुरवस्था झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असताना आता शहरात अजूनही मोजक्याच ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. असे असताना आता महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनीही क्षेत्रीय कार्यालये, वाहतूक नियोजन विभाग, विद्युत विभागाने समन्वय ठेवून या सर्व पादचारी भुयारी मार्गांची त्वरित दुरुस्ती करून घ्या असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता तरी ढिम्म प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

पुणे महापालिकेतर्फे शहरात २० पादचारी भुयारी मार्ग बांधण्यात आलेले आहेत. या प्रत्येक भुयारी मार्गासाठी दोन ते तीन कोटी रुपये खर्च झाले आहेत. भुयारी मार्गात नागरिकांची वर्दळ असावी, सुरक्षीत वातावरण असावे यासाठी आतमध्ये गाळे काढण्यात आले. शहरातील प्रमुख चौकात तसेच ज्या ठिकाणी रस्ता ओलांडता येणार नाही अशा ठिकाणी हे भुयारी मार्ग बांधले. पण त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत हे भुयारी मार्ग म्हणजे तळीरामांचे अड्डे झाल्याचेही निदर्शनास आले. अशा स्थितीत महिला व इतर नागरिकांकडून या मार्गाचा वापर होत नाही. भर चौकातून वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना नागरिकांची कसरत होत आहे.

याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर कोथरूड येथील वनाज, डहाणूकर कॉलनी, सोलापूर रस्ता येथील वैदुवाडी, फातिमानगर, आळंदी रस्ता याठिकाणची भुयारी मार्गांची स्वच्छता झाली. जंगली महाराज रस्ता, चंदननगर व इतर ठिकाणी प्रशासन ढिम्मच आहे. शहरातील भुयारी मार्गांची स्वच्छता करण्यासाठी वाहतूक नियोजन विभागाने क्षेत्रीय कार्यालयांना आदेश दिले आहेत. पण वाहतूक नियोजन विभागाकडूनच प्रमुख देखभाल दुरुस्ती, शटर, सुरक्षा ही कामे होत नसल्याने खोळंबा झाला आहे.

१८ - शहरातील पादचारी भुयारी मार्गांची संख्या

३ - कोटी रुपये प्रत्येक मार्गाचा किमान खर्च

पुणे शहरातील पादचारी मार्ग स्वच्छ असले पाहिजेत. प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक यांची पुरेशी व्यवस्था असली तर नागरिकांकडून त्यांचा चांगला वापर होतो. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त, विद्युत विभाग, वाहतूक नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित भुयारी मार्ग स्वच्छ करून घ्यावेत. देखभाल-दुरुस्तीची कामे वेगात करून त्याचा अहवाल सादर करावा असे आदेश दिले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply