पुणे प्रशासकांचा अतिक्रमणांना पहिला दणका बसणार

पुणे महापालिकेवर प्रशासक आल्यानंतर त्याचा सगळ्यात पहिला दणका इमारतीच्या सामाईक अंतरात अतिक्रमण करणाऱ्या जागा मालकांना बसणार आहे. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार इमारतीच्या पुढील जागेत असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार आहे. इतरवेळी राजकीय दबाव आणून ही कारवाई थांबवली जायची; पण आता प्रशासक असल्याने परिणामकारक कारवाईचे नियोजन केले आहे. महापालिकेतर्फे बांधकाम परवानगी देताना सामाईक अंतर सोडले आहे का, हे पाहिले जाते. यामध्ये इमारती समोरील आणि बाजूने जागा सोडणे बंधनकारक आहे. इमारतीच्या चारीही बाजूने मोकळी हवा खेळती राहावी व अपत्कालीन स्थितीत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे अंतर महत्त्वाचे असते. शहरातील इमारतींचे दर वाढत असल्याने, दुकानांचे भाडेही जास्त आहे. यातून पळवाट काढण्यासाठी अनेक जागा मालक इमारतीसमोरील जागेमध्ये अतिक्रमण करतात. यात पक्के बांधकाम करून किंवा शेड मारून ही जागा बंदिस्त केली जाते. त्यामुळे विद्रूपीकरणात भर पडते, पार्किंगच्या जागेत व्यवसाय सुरू केल्याने संबंधित इमारतींमधील गाड्या रस्त्यावर लावल्या जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. शहरात इमारती समोरील आणि बाजूच्या जागेचा वापर करून अनेक ठिकाणी हॉटेल, गॅरेज, फळ विक्री, भाजीविक्रेते अशा प्रकारचे लहानमोठे व्यवसाय सुरू केले आहेत. त्याचप्रमाणे अनेक मोठ्या व्यापाऱ्यांनी या जागेचा वापर करून तेथे गोडाऊन किंवा दुकाने थाटली आहेत. महापालिकेने दिलेल्या परवानगीशिवाय परस्पर कोणताही बदल करून पक्के बांधकाम किंवा कच्चे बांधकाम करता येत नाही. महापालिकेने यावर कारवाई सुरू केली की नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते दबाव आणून कारवाई रोखत असत, त्यामुळे परिणामकारक कारवाई होत नव्हती. आता महापालिकेने याकडे मोर्चा वळवला आहे. महापालिकेवर १५ मार्चपासून प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. महापालिकेच्या कामातील राजकीय हस्तक्षेप कायदेशीरपणे बंद झाला आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी शहरातील फ्रंट व साइड मार्जिनमधील कारवाईचे आदेश दिले आहेत. महापालिकेची जय्यत तयारी महापालिकेचे ५ परिमंडळ कार्यालय असून, त्यात १५ क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश आहे. परिमंडळाने संबंधित क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय साधून कारवाईचे नियोजन करावे. या पथकात अतिक्रमण निरीक्षक, बिगारी, पोलिस कर्मचारी यांचा समावेश असेल. तसेच जेसीबी, गॅस कटर यांचाही वापर कारवाईत केला जाईल. फ्रंट मार्जिन व साइड मार्जिनमध्ये कारवाई करण्यासाठी प्रत्येक परिमंडळात पथक तयार केले आहे. आठवड्याचे दोन दिवस परिमंडळ कार्यालयनिहाय या अतिक्रमणांवर कारवाई केली जाईल यासाठी पुरेसे मनुष्यबळ, पोलिस बंदोबस्त याचे नियोजन केलेले आहे. महापालिकेने कारवाई करण्यापूर्वीच नागरिकांनी त्यांचे अतिक्रमण काढून घ्यावे. - माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण विभाग कुठे पडणार हातोडा
  • इमारतीसमोर आणि बाजूला बांधलेले शेड
  • उभारण्यात आलेले छोटेखानी व्यवसाय
  • परवानगीशिवाय परस्पर केलेले बांधकाम


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply