पुणे : पोलिसांवर दगडफेक, चाकूहल्ला करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या

पुणे : घरफोडीच्या घटना घडत असतानाच तेथे दाखल झालेल्या पोलिसांवर दगडफेक, चाकू फेकून मारण्याच्या प्रकरणात पोलिसांनी चोरट्यांच्या दिशेने गोळीबार केल्याची घटना घडली होती. या घटनेचा मार्केट यार्ड पोलिसांनी कसून तपास करीत पुण्यासह राज्यभरात घरफोड्या करणाऱ्या टोळीच्या मुसक्‍या आवळल्या. पोलिसांनी चोरट्यांकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह घरफोडीसाठी वापरलेले साहित्य आरोपींकडून जप्त केले. नवलसिंग अजम अलावा (वय 40, रा. धार, मध्यप्रदेश) , भाया भांगु देवका (वय 32) विनोद रमेश सिसोदिया (वय 29 दोघेही रा. कुकशी, धार, मध्यप्रदेश ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मार्केट यार्ड परिसरातील चाफळकर कॉलनी येथे 22 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास एका सोसायटीत चोरट्यांकडून घरफोडी करण्यात आली होती. त्याची खबर मार्केट यार्ड पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोरट्यांनी पोलिसांवर दगडफेक, कोयता फेकून हल्ला चढविला होता. पोलिसांनीही चोरट्यांचा जोरदार प्रतिकार करीत त्यांच्यावर गोळीबार केला. दरम्यान, अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पळून गेले होते. या प्रकरणाचा मार्केट यार्ड पोलिसांकडून कसून तपास सुरु होता. तपास पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मदन कांबळे व त्यांच्या पथकाकडून सीसीटीव्ही चित्रीकरण व अन्य तांत्रिक विश्‍लेषण करून आरोपींचा शोध घेतला जात होता. तेव्हा संबंधि आरोपी हे जनता वसाहतीमध्ये गेल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणावरुन दिसून आले.त्यानुसार, पोलिसांकडून संबंधित आरोपींवर रात्रपाळत ठेवण्यात आली होती. दरम्यान, संबंधित प्रकरणातील तीन आरोपी पर्वती येथील कालव्याच्या परिसरात दिसून आले. तेव्हा त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांच्या पथकाने त्यांना सापळा रचून पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यावेळी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, घरफोडीसाठी वापरलेले कटर, टॉमी व अन्य साहित्य जप्त केले. हि कामगिरी परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मदन कांबळे, हिरवाळे, किरण जाधव, महेश जाधव, आशिष यादव, स्वप्नील कदम, संदीप सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply