पुणे: पुरंदर-हवेलीमधील गावे महापालिका हद्दीतून वगळा; माजी आमदार विजय शिवतारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे : पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघातील गावांमध्ये पायाभूत सुविधांची वानवा असताना पुणे महापालिकेने समाविष्ट गावांना मनमानी पद्धतीने मिळकतकर आकारणी केली आहे. त्यामुळे मिळकतकर कमी करावा किंवा गावांना महापालिका हद्दीतून वगळण्यात यावे आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत म्हणून या गावांना पुुन्हा पूर्वीचा दर्जा द्यावा, अशी आग्रही मागणी माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

महापालिका हद्दीमध्ये ऑक्टोबर २०१७ मध्ये अकरा गावांचा आणि त्यानंतर गेल्या वर्षी जुलै महिन्यात तेवीस अशा एकूण ३४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. विजय शिवतारे यांच्या पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, फुरसुंगी, गंगानगर, भेकराईनगर, ढमाळवाडी, पापडेवस्ती, उरूळी देवाची, उंड्री, पिसोळी, येवलेवाडी, मांगडेवाडी, कोळेवाडी, भिलारे वाडी, हांडेवाडी, होळकरवाडी, औताडेवाडी, शेवाळेवाडी, गुजार निंबाळकरवाडी, जांभूळवाडी या गावांचा यामध्ये समावेश आहे.

महापालिका हद्दीत गावांचा टप्प्याटप्याने समावेश झाल्यानंतर त्यांना महापालिकेकडून मिळकतकर आकारणी करण्यात आली. महापालिका हद्दीत समावेश झाल्यानंतरही नागरी सुविधा महापालिकेकडून उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, अशा तक्रारी स्थानिक नागरिकांनी सातत्याने केल्या आहेत. पाणीपुरवठ्याबाबत आणि रस्त्यांबाबतही तक्रारी आहेत. गावातील मिळकतींना ग्रामपंचायतींनी निश्चित केलेल्या मिळकतकरातही केलेल्या वाढीबाबत नाराजी आहे. त्यामुळे यासंदर्भात विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे. मिळकतकर करातून नागरिकांना दिलासा देता येत नसेल तर पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायती पुनर्स्थापित करावी, गावांना महापालिका हद्दीतून वगळण्यात यावे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक घ्यावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply