पुणे पुन्हा राज्यात सर्वांत थंड; हंगामात तिसऱ्यांदा राज्यातील नीचांकी तापमान

पुणे शहर आणि परिसरातील तापमानात झपाट्याने चढ-उतार होत असून, एकाच दिवसात रात्रीच्या किमान तापमानात ३ अंश सेल्सिअसने घट होऊन गुरुवारी (१० नोव्हेंबर) शहरात १२.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे यंदाच्या हंगामात पुण्यात तिसऱ्यांदा राज्यात नीचांकी तापमान नोंदविले गेले. तापमानातील चढ-उतार पुढील काही दिवस कायम राहणार आहे. त्याचप्रमाणे दोन दिवसांनंतर शहरात अंशत: ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

पुणे शहरामध्ये ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमानात घट होऊन थंडी अवतरली. त्यानंतर रात्रीचे किमान तापमान सातत्याने १३ ते १४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहिले आहे. ईशान्य मोसमी वाऱ्यांचा दक्षिणेकडे प्रभाव सुरू झाल्यानंतर राज्यात काही भागांत अंशत: ढगाळ स्थिती निर्माण होत आहे. त्याचा परिणाम पुणे आणि परिसरावरही काही प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे रात्रीच्या किमान तापमानात काही प्रमाणात चढ-उतार होत आहेत. पुणे शहरात बुधवारी (९ नोव्हेंबर) किमान तापमान थेट १५.८ अंशांवर पोहोचले होते. मात्र, एकाच दिवसात त्यात तीन अंशांनी घट झाली. त्यामुळे गुरुवारी (१० नोव्हेंबर) पुण्यात १२.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान राज्यातील नीचांकी तापमान ठरले. दिवसाच्या कमाल तापमानातही घट होऊन ते ३०.६ अंशांवर आले आहे.

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार आणखी एक दिवस शहरात आकाशाची स्थिती निरभ्र राहणार आहे. त्यामुळे दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होईल. त्याचप्रमाणे रात्रीच्या किमान तापमानातील घट कायम राहणार आहे. १२ नोव्हेंबरपासून शहरातील आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. परिणामी किमान आणि कमाल तापमानात काही प्रमाणात चढउतार होण्याची शक्यता आहे.

पुणे शहरात यापूर्वी ३० ऑक्टोबरला १२.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. हे तापमान राज्यातील आणि शहरातील नीचांकी तापमान ठरले होते. त्यानंतर ३ नोव्हेंबरलाही १३.१ अंश राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. १० नोव्हेंबरला शहरात १२.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदिवले गेले. हे तापमान यंदाच्या हंगामातील राज्यातील तिसरे नीचांकी तापमान ठरले आहे. विशेष म्हणजे सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात २.९ अंशांची घट नोंदविली गेली. ही घटही राज्याच्या इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक ठरली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply