पुणे – नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्पासाठी ३० हेक्टर भूसंपादन, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने पुणे – नाशिक मार्गावर वेगवान प्रवासासाठी सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला असून या प्रकल्पासाठी आवश्यक १,४५० हेक्टरपैकी ३० हेक्टर खासगी जागा संपादन करण्यात आल्याची माहिती ‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन लिमिटेड’कडून (एमआरआयडीसीएल) देण्यात आली. तसेच सरकारी आणि वन जमीन संपादनाचीही प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, निती आयोगाच्या मंजुरीनंतर हा प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे सादर करण्यात आला आहे.

पुणे – नाशिक असा थेट मार्ग नसल्याने पुणे किंवा नाशिक गाठण्यासाठी मुंबईला येऊन रेल्वे पकडावी लागते. त्यामुळे प्रवासासाठी सहा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. प्रवास वेळ कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सेमी हायस्पीड संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. ही मार्गिका पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतून जाणार आहे. त्यासाठी १०२ गावांमधील एक हजार ४५० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. भूसंपादन आणि संरेखनासाठी संयुक्त मोजमाप सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यामध्ये सरकारी आणि वन जमिनीचाही समावेश आहे. आतापर्यंत ३० हेक्टर खासगी जागा संपादित करण्यात आली असून ही प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राबविली जात आहे. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांना मोबदलाही देण्यात येत आहे. एप्रिलमध्ये या प्रकल्पाला निती आयोगाने मंजुरी दिली आहे. आता केंद्रीय मंत्रिमंडळाकडून लवकरच अंतिम मंजुरीही मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग २३५.१५ किलोमीटर लांबीचा असून दोन मार्ग बनवण्यात येतील. या मार्गावरुन प्रतितास २०० किलोमीटर वेगाने गाडी धावेल. त्यामुळे पुण – नाशिक अंतर पावणेदोन ते दोन तासांत कापले जाईल. याचा वेग जास्तीत जास्त प्रतितास २५० किलोमीटरपर्यंत वाढू शकतो. पुणे, अहमदनगर, नाशिक अशा तीन जिल्ह्यांतून ही रेल्वे धावेल. प्रकल्पासाठी १६ हजार ३९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

हायस्पीड रेल्वेचा मार्ग असा

हायस्पीड रेल्वे पुणे रेल्वे स्थानकातून सुटताच हडपसरपर्यंत उन्नत मार्गावरुन धावेल. त्यानंतर हडपसर ते नाशिक रेल्वे स्थानकापर्यंत जमिनीवरुन धावणार आहे. या रेल्वेला चाकण, मंचर, नारायण गाव, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक येथे थांबा असेल. हायस्पीड रेल्वे सहा डब्यांची असेल.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply