पुणे : नागरीकाचा खुन करुन आत्महत्या केल्याचा बनाव उघडकीस

पुणे : कात्रजयेथील लक्ष्मी माता मंदिराजवळ लोखंडी पाईपला एका नागरीकाने गळफास घेतल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीसह आली होती. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या पाहणीत व वैद्यकीय अहवालामध्ये संबंधित व्यक्तीने आत्महत्या केली नसून हा खुनाचा प्रकार असल्याचे उघड झाले. तसेच संबंधित व्यक्तीचा खुन करुन आत्महत्या केल्याचा बनाव रचला, निष्पन्न झाले.

प्रकाश किसन जाधव (वय 42, रा. सुधामातानगर, कात्रज) हे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस नाईक नंदलाल हरिश्‍चंद्र भादले यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव हे बिगारी काम करीत होते. कात्रज परिसरातील सुंधामाता नगर परिसरात ते त्यांच्या कुटुंबासमवेत राहात होते. दरम्यान, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घराजवळील लक्ष्मीमाता मंदिर परिसरातील एका पाईपाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले होते.

पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला. उत्तरीय तपासणीमध्ये जाधव यांचा गळा दाबून तसेच त्यांच्या डोक्‍यावर जड वस्तुने जोरदार मारहाण केल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचे निदर्शनास आले. त्यांचा मृत्यु झाल्यानंतर मृतदेहाच्या गळ्याभोवती दोरी लावून तो लोखंडी पाईपाला लटकावून जाधव यांनी आत्महत्या केल्याचा बनाव रचन्यात आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संगिता यादव करीत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *