पुणे : “नको त्या गोष्टींच्या खोलात जाऊ नका”; अजित पवारांच्या प्रश्नावर भडकले नितीन महाराज मोरे

पुणे : मंगळवारी देहू येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते करण्यात आले. देहूतील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांना भाषण करू न दिल्यामुळे राज्यभर राजकारण तापलं आहे. याप्रकरणी देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी कार्यक्रमानंतर त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. मात्र पुन्हा या प्रकरणी प्रश्न विचारल्याने नितीन महाराज पत्रकारांवर चांगलेच भडकले. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद सोडून जाण्याचाही प्रयत्न केला. आमदार अण्णा बनसोडे हे जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला २१ किलो चांदी पासून बनवलेल्या पूजेच साहित्य देणार आहेत. याची माहिती देण्यासाठी पिंपरीत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यासाठी देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे यांना आमंत्रित करण्यात आले होते.

पत्रकार परिषद सुरू होताच काही मिनिटांनी पत्रकारांनी अण्णा बनसोडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी प्रश्न विचारला. यावर बनसोडे यांनी जास्त काही बोलणं योग्य नसल्याचं सांगून याविषयी नितीन महाराज बोलतील असे म्हणत त्यांच्याकडे माईक दिला. 

यासंदर्भात बोलताना नितीन महाराज म्हणाले की, पंतप्रधान मोदींचे भाषण ३ ते ४ वेळेस दाखवायला हवं होतं. देहू संस्थानाबाबत माध्यमांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम केले जात आहे. वारकरी संप्रदायाला संप्रदायाच्या ठिकाणी आणि राजकारणाला राजकारणाच्या ठिकाणी ठेवा. नको त्या गोष्टींच्या खोलात जाऊ नका.”

पत्रकारांनी पुन्हा त्या प्रकरणी प्रश्न विचारल्याने नितीन मोरे यांनी स्पष्टीकरण दिले. “त्या गोष्टीचा संदर्भ आजच्या कार्यक्रमाला लावायचा असेल तर मी नम्रपणे माफी मागतो आणि इथून जाणं पसदं करतो. या अगोदरही सांगितलं आहे की देहू संस्थान धार्मिक क्षेत्रात काम करते. त्याला राजकारणात आणण्याचा प्रयत्न करू नये. नाही त्या गोष्टी तुम्ही पुन्हा वाढवू नका. तुम्हाला योग्य वेळी योग्य उत्तरे दिली जातील,” असे नितीन महाराज म्हणाले.

पत्रकारांनी पुन्हा प्रश्न विचारल्यानंतर नितीन महाराज यांनी पत्रकार परिषद सोडून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना संजय महाराज मोरे यांनी समजूत काढत नितीन महाराज मोरे यांना थांबवले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply