पुणे : धावण्याचा सराव करणाऱ्या महिलांची टिंगल अंगलट; खराडीत दोन उच्चशिक्षित तरूणांना अटक

पुण्यात महिलांची टिंगल करणाऱ्या दोन उच्चशिक्षित तरुणांना चंदननगर पोलिसांनी अटक केली. खराडी भागात महिलांची टिंगल करुन पसार झालेल्या दोघांचा पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे माग काढला. या प्रकरणी परिमल जोशी (वय २८, मूळ रा. माजलगाव, जि. बीड), निखिल पाटील (वय २९, मूळ रा. चोपडा, जि. जळगाव) यांना अटक करण्यात आली.

याबाबत एका ४२ वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार महिला संगणक अभियंता आहे. १ मे रोजी महिला आणि मैत्रिणी धावण्याचा सराव करत होत्या. त्यावेळी खराडीतील गेरा इम्पेरियम अल्फा सोसायटीसमोर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धावणाऱ्या महिलांची टिंगल केली आणि ते पसार झाले.

महिलेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले. चित्रीकरणात दुचाकीचा क्रमांक मिळाला. त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. दोघे जण पेईंग गेस्ट म्हणून ज्या इमारतीत राहत होते. त्या इमारतीचा पत्ता पोलिसांनी मिळवला. दोघेजण खासगी कंपनीत चांगल्या पदावर काम करत असल्याची माहिती मिळाली. या दोघांना अटक करण्यात आली आहे.

घटनेच्या एक दिवस आधी दोन्ही आरोपींनी रात्रभर दारू प्यायली होती. सकाळी उठल्यानंतर दोघे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी आरोपींनी महिलांना पाहून त्यांची टिंगल केली. महिलांनी आरओरडा केल्यानंतर दोघे दुचाकीवरुन पसार झाले.

चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव, गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील थोपटे, सहायक निरीक्षक मनोहर सोनावणे, उपनिरीक्षक दिलीप पालवे, सचिन कुटे, विक्रांत सासवडकर, सुभाष आव्हाड, संदीप येळे आदींनी ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply