पुणे : द्रुतगती मार्गावर अपघात रोखण्यासाठी ‘सुरक्षा’ मोहीम; जनजागृतीसाठी २४ तास गस्त, प्रादेशिक परिवहन विभागाची १२ पथके

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाकडून ‘सुरक्षा’ ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. गुरुवारपासून (एक डिसेंबर) या मोहिमेस सुरुवात करण्यात येणार आहे.मुंबई, पुणे, पनवेल, पिंपरी-चिंचवड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची १२ पथके गस्त घालणार आहेत. द्रुतगती आणि मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘सुरक्षा’ ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. पुढील सहा महिने या दोन्ही महामार्गावर सहा पथके आणि १५ अधिकारी २४ तास कार्यरत राहणार आहेत.

अपघातग्रस्त ठिकाणांची (ब्लॅकस्पाॅट) पाहणी करण्यात येणार असून सुरक्षेच्या दृष्टीने अपघातग्रस्त ठिकाणी वाहनचालकांना माहिती देण्यासाठी फलक लावण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. अजित शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. द्रुतगती मार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या कडेला लावण्यात येणाऱ्या वाहनांवर त्वरित कारवाई करण्यात येणार आहे. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ठिकाणांची पाहणी करण्यात येणार आहे. दोन्ही महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत ध्वनिवर्धकावरून वाहनचालकांना आवाहन करण्यात येणार आहे. टोलनाक्यावर ध्वनिवर्धकाद्वारे वाहनचालकांना वाहतूकविषयक नियमांची माहिती देण्यात येणार आहे.

भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी इंटरसेप्टर वाहनांचा वापर करण्यात येणार आहे. उजव्या मार्गिकेत कमी वेगाने जाणारे ट्रक, बस, कंटेनरचालकांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. चुकीच्या पद्धतीने मार्गिका बदलणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे.

महामार्गावरील ८० टक्के अपघात वाहनचालकांच्या चुकांमुळे झाले आहेत. भरधाव वेग, निष्काळजीपणा, बेफिकिरी, नियम न पाळल्यामुळे अपघात झाल्याचे निरीक्षण आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन केल्यास गंभीर स्वरूपाचे अपघात रोखणे शक्य होईल.- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply