पुणे : देहूमध्ये आज बीज सोहळा; हजारो भाविक दाखल

देहू : जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज ३७४ वा बीज सोहळा रविवारी (ता. २०) असल्याने राज्याच्या विविध कानाकोपऱ्यांतून हजारो भाविक आणि दिंड्या शनिवारी देहूत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे देहूनगरी विठुनामाच्या गजरात दंग झाली आहे. गावात ठिकठिकाणी गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी संत तुकाराम महाराज देऊळवाडा आणि वैकुंठस्थान मंदिरात देहूरोड पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे देहूला छावणीचे स्वरूप आले आहे. शनिवारपासूनच मुख्य देऊळवाड्यात आणि वैकुंठस्थान मंदिरात पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. वडिवळे धरणातून इंद्रायणी नदीला पाणी सोडल्याने इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. मुख्य देऊळवाड्यात दर्शनासाठी जाण्यापूर्वी भाविकांनी इंद्रायणी नदीत स्नान केले. त्यानंतर भाविकांनी दर्शनबारीतून विठ्ठलरुक्मिणी, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात दर्शन घेतले. बीज सोहळ्यासाठी पंढरपूर, आळंदी या भागातून आलेल्या प्रसाद विक्रेत्यांनी ठिकठिकाणी प्रसादाची दुकाने थाटली आहेत. मुख्य देऊळवाडा, वैकुंठस्थान, गावाचे प्रवेशद्वार परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्य सोहळा वैकुंठस्थान मंदिरात आहे. बंदोबस्तासाठी ७ पोलिस निरीक्षक, ३० पोलिस अधिकारी, १६० पोलिस कर्मचारी, ५० वाहतूक नियंत्रक पोलिस, ३० पोलिस महिला, ५० होमगार्ड, ४० खासगी सुरक्षारक्षक, पोलिस मित्र संघटनेचे पदाधिकारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply