पुणे : दक्षिणेकडील पावसाचा महाराष्ट्रावर परिणाम; गारवा कमी होणार, ढगाळ वातावरणाची शक्यता

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम म्हणून सध्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही भागांत जोरदार पाऊस सुरू झाला असून, त्याचा काही प्रमाणात परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. सध्या राज्यात सर्वच भागांतील किमान तापमान सरासरीखाली असल्याने गारवा कायम आहे. मात्र, दोन दिवसांनंतर तापमानात वाढ होणार असून, काही भागांत ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी १३ ते १५ नोव्हेंबर दरम्यान हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

दक्षिणेकडील राज्यांमध्ये सध्या ईशान्य मोसमी वाऱ्यांचा प्रभाव आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत आहे. ते पश्चिम-उत्तर दिशेने पुढे सरकते आहे. त्यामुळे तमिळनाडू त्याचप्रमाणे जवळच्या राज्यांमध्ये जोरदार पाऊस होत असून, पुढील दोन दिवस पावसाची शक्यता कायम आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही १३ नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे केरळमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. परिणामी या काळामध्ये दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात चढ-उतार होणार आहेत. मराठवाडा आणि विदर्भात मात्र कोरड्या हवामानाची स्थिती राहणार आहे.

सद्य:स्थितीत राज्यातील सर्वच भागांत किमान तापमान सरासरीच्या खाली असल्याने रात्रीचा गारवा कायम आहे. शुक्रवारी (११ नोव्हेंबर) पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील नीचांकी १२.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, परभणी, अमरावती, बुलढणा, गोंदिया, रत्नागिरी आदी भागांतही तापमानात सरासरीच्या तुलनेतच घट आहे. मुंबईत रात्रीच्या तापमानाचा पाराही सरासरीखाली आहे. मात्र, मुंबईसह संपूर्ण कोकणात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे असल्याने दिवसा उन्हाचा चटका आहे. शुक्रवारी रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply