पुणे : जानेवारी महिन्यात प्रसिद्ध केलेलीच मतदार यादी महापालिका निवडणुकांसाठी वापरणार

पुणे : महापालिका निवडणुकांसाठी जानेवारी २०२२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीतील मतदारांनाच मतदान करण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे नगरसेवकांनी गेल्या तीन महिन्यांपासून प्रभागनिहाय मतदार नोंदणी मोहीम घेऊन केलेले प्रयत्न वाया जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित मतदारांची नावे सप्टेंबर महिन्यामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या प्रारुप मतदार यादीत समाविष्ट होणार असल्याने जानेवारी महिन्यात प्रसिद्ध केलेली यादीच महापालिका निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. 

महापालिकांच्या निवडणुकांसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून तयार करण्यात येणारी मतदार यादी वापरण्यात येते. सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिका निवडणुका लवकरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदार संघांच्या निवडणुकांसाठी पुरवणी मतदार यादी तयार करण्यात येते. उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी दहा दिवस अगोदर अर्ज करणाऱ्या मतदारांचा समावेश पुरवणी मतदार यादीमध्ये होत असतो. महापालिका निवडणुकांसाठी पुरवणी मतदार यादी तयार करण्यात येत नसते. त्यामुळे जानेवारी २०२२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीतील मतदारांना महापालिका निवडणुकांसाठी मतदान करता येणार असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले

महापालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन नगरसेवकांनी आपापल्या प्रभागांमध्ये मतदार नोंदणीसाठी मोहीम घेऊन मतदारांचे ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज भरून घेतले आहेत. हक्काचे मतदार मिळण्यासाठी नगरसेवकांनी केलेले हे प्रयत्न वाया जाणार आहेत. संबंधित मतदारांची नावे सप्टेंबर महिन्यात प्रसिद्ध होणाऱ्या प्रारुप मतदार यादीत समाविष्ट होणार आहेत. मात्र, महापालिका निवडणुका या त्यापूर्वीच होण्याची शक्यता असल्याने संबंधित मतदार महापालिकेच्या निवडणुकांमध्ये मतदानापासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

लोकप्रतिनधींनी जानेवारी महिन्यामध्येही मतदार वाढविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघांमध्ये दोन लाख ६२ हजार ६४५ मतदारांची भर पडली. आता जिल्ह्यातील मतदार संख्या ८१ लाख ५८ हजार ५३९ झाली आहे. त्यामध्ये पुणे शहरातील आठ विधानसभा मतदार संघांमध्ये मतदारांची संख्या ३२ लाख २२ हजार ७९०, तर पिंपरी-चिंचवडमधील तीन मतदार संघांमध्ये १४ लाख ३१ हजार ८८७ मतदार आहेत. 

वडगाव शेरी चार लाख ७१ हजार दहा, शिवाजीनगर दोन लाख ९० हजार ९१९, कोथरुड चार लाख ३४ हजार ५७५, खडकवासला पाच लाख ४० हजार ५७२, पर्वती तीन लाख ५६ हजार २१२, हडपसर पाच लाख ५५ हजार ९१०, पुणे कॅन्टोन्मेंट दोन लाख ८७ हजार ५३५ आणि कसबा पेठ दोन लाख ८६ हजार ५७ असे एकूण मतदार ३२ लाख २२ हजार ७९०

मतदार यादीत नाव आहे किंवा कसे हे NVSP.In किंवा Voters Helpline या उपयोजनवर (अ‍ॅप) पाहता येणार आहे. Electoral Search या निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावरही यादी पाहण्यासाठी उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply