पुणे : चांदणी चौकातील जूना उड्डाणपूल पाडण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्रारूप आराखडा तयार

पुणे : चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याचा प्रारूप आराखडा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) तयार केला आहे. त्यावर पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांचा अभिप्राय मागविण्यात आला असून त्यांतर हा आराखडा अंतिम केला जाणार आहे. एनएचएआयने तयार केलेल्या प्रारूप आराखड्यानुसार नवीन उड्डाणपुलाच्या तीन मार्गिका सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामध्ये मुळशीकडून येऊन बावधन, कोथरूड, वारजेकडे जाणे आणि हिंजवडी, मुंबईच्या दिशेला जाणे शक्य होणार आहे.

महामार्ग प्राधिकरणाकडून चांदणी चौक येथील उड्डाणपूल आणि सेवा रस्त्यांची कामे केली जात आहेत. प्राधिकरणाच्या दाव्यानुसार येथील जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित ३० टक्के काम जून २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. चांदणी चौकातील उड्डाणपूल प्रकल्पाअंतर्गत येथील जुना अरुंद पूल पाडून त्या ठिकाणी ११५ मीटर लांब आणि ३६ मीटर रुंद नवीन पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या आठवड्यात जुना पूल पाडण्यात येणार असून त्यानंतर वाहतुकीची व्यवस्था कशी असेल, त्याचे प्राथमिक नियोजन एनएचएआने केले आहे. जुन्या पुलावरून सध्या मुळशी येथून पाषाण, बावधन आणि कोथरूड अशी एकेरी वाहतूक सुरू आहे. हा पूल पाडल्यानंतर तातडीने तेथे नवीन पुलाचे काम सुरू केले जाणार आहे. तसेच सेवा रस्त्यांची रखडलेली कामेही सुरू करता येणार आहे. मात्र, तोपर्यंत वाहन चालकांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे.

प्रस्तावित वाहतूक व्यवस्था

१) एनडीए, मुळशीकडून येऊन बावधन, पाषाण, वारजे आणि कोथरूडकडे जाणाऱ्यांनी नव्याने तयार केलेल्या उड्डाणपुलावरील मार्गिका (रॅम्प) एकचा वापर करावा
२) एनडीए, मुळशीकडून येऊन मुंबईकडे जाणारी वाहतूक मार्गिका तीन आणि सातवरून सोडण्यात येईल
३) मुंबईकडून येऊन बावधन किंवा पाषाणला जाण्यासाठी महामार्गावरील पाषाण कनेक्टर रस्त्याने (विवा ईन हॉटेल) जाता येईल
४) मुंबईकडून येऊन मुळशीकडे जाण्यासाठी कोथरूड भुयारी मार्गाने एनडीए चौक मार्गे वेदविहार, मुळशी, एनडीएला जाता येईल
५) बावधन, पाषाणकडून वारजे, कात्रजकडे जाण्यासाठी पाषाण कनेक्टर रस्त्याचा वापर करावा लागेल
६) कोथरूड ते सातारा, वारजे ही वाहतूक सातारा महामार्गावरील सेवा रस्त्यावरील शृंगेरीमठाजवळून महामार्गावर वळविलेल्या मार्गाने जाईल
७) वारजे, साताऱ्याकडून येऊन पाषाण, बावधनकडे जाणाऱ्यांना नवीन उड्डापुलाच्या मार्गिका सातवरून मुळशी रस्त्याला जाऊन मार्गिका एकवरून जावे.

चांदणी चौकातील जुना पूल पाडणे आणि त्या काळात करण्यात येणाऱ्या वाहतुकीच्या नियोजनाबाबत एनएचएआयने प्रारूप आराखडा तयार केला आहे. तो आराखडा पुणे, पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाठविण्यात आला आहे. त्यांच्याकडून या आराखड्यावर काही सूचना असल्यास त्या स्वीकारून हा आराखडा अंतिम केला जाईल. – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply