पुणे : ‘कोयता गँग’चा बंदोबस्त करण्यासाठी ‘स्पेशल स्कॉड’; रजनीश शेठ यांची माहिती

पुणे - शहरात कोयते हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या ‘कोयता गँग’चा बंदोबस्त करण्यासाठी ‘स्पेशल स्कॉड’ निर्माण करण्यात आले आहे. या विशेष पथकाच्या माध्यमातून गुन्हे रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली.

पुण्यातील वानवडी येथे राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक-२ येथे सुरू असलेल्या ३३ व्या महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांच्या हस्ते बुधवारी झाले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शहरात ‘कोयता गँग’मधील गुंडांकडून गर्दीच्या ठिकाणी कोयते हातात घेऊन नागरिकांमध्ये दहशत माजविण्याच्या घटना होत आहेत. या प्रश्नासंदर्भात पोलिस महासंचालक रजनीश शेठ म्हणाले, ‘कोयता गँग’बाबत पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दखल घेतली आहे. दहशत माजविणाऱ्यांवर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत महाराष्ट्र पोलिस दल सक्षम आहे. २०२२ वर्ष हे पोलिस दलासाठी चांगले गेले. राज्यात कोठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. नक्षलविरोधी कारवाईमध्येही गडचिरोली आणि गोंदिया भागात पोलिस दलाची कामगिरी उत्तम आहे. पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या लवकरच होतील. त्याबाबत गृह विभागाकडून कार्यवाही सुरू आहे, असे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धा दरवर्षी होतात. परंतु कोरोनामुळे तीन वर्षांनंतर ही क्रीडा स्पर्धा पुण्यात होत आहे. राज्य पोलिस दलातील अनेक अधिकारी-कर्मचारी खेळाडू यात सहभागी होतात. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी पाठविण्यात येते. मागील राष्ट्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र पोलिस दलाने तिसरा क्रमांक मिळवला होता. त्या स्पर्धेत महाराष्ट्र पोलिसांनी ३० मेडल पटकावले होते. पोलिस दलातील अधिकारी-कर्मचारी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहतील तसेच, चांगले खेळाडू निर्माण व्हावेत, या उद्देशाने क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply