पुणे : उस्ताद कादरबक्ष यांची प्रतिमा पुन्हा बालगंधर्व रंगमंदिरामध्ये लावण्याची कुटुंबीयांची मागणी

पुणे : बालगंधर्व यांना सारंगीवादनाची साथसंगत करणारे उस्ताद मुल्लाजी कादरबक्ष यांची प्रतिमा बालगंधर्व रंगमंदिरामध्ये पुन्हा लावण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. प्रतिमेची फ्रेम दुरुस्त होऊन मिळाली असून सोमवारी (७ नोव्हेंबर) ती लावण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बालगंधर्व रंगमंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर दालनाच्या मध्यभागी बालगंधर्व यांच्यासह त्यांना साथसंगत करणारे तबलावादक उस्ताद अहमदजान थिरकवा, सारंगीवादक उस्ताद मुल्लाजी कादरबक्ष व महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. मात्र, त्यातील उस्ताद कादरबक्ष यांची प्रतिमा दिसत नाही. या दालनामध्ये ती प्रतिमा पुन्हा लावण्यात यावी, अशी मागणी कादरबक्ष यांचे नातू उस्ताद फैयाज हुसेन खाँ आणि उस्ताद अन्वर कुरेशी यांनी बालगंधर्व व्यवस्थापकांकडे केली आहे.

बालगंधर्व रंगमंदिराच्या दालनात २५ वर्षांपासून आमचे आजोबा उस्ताद कादरबक्ष यांची प्रतिमा लावण्यात आली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी माझ्या मुलाचा बालगंधर्व रंगमंदिर येथे एक कार्यक्रम होता. तेथे ही प्रतिमा दिसली नाही. यासंदर्भात व्यवस्थापकांकडे चौकशी केली असता त्यांनाही या गोष्टीची कल्पना नव्हती. ही प्रतिमा पुन्हा लावावी, अशी मागणी करणारे पत्र आम्ही व्यवस्थापकांना दिले असल्याचे अन्वर कुरेशी यांनी सांगितले.

उस्ताद कादरबक्ष यांच्या प्रतिमेची फ्रेम खराब झाल्यामुळे ती दुरुस्तीसाठी देण्यात आली होती. ती दुरुस्त होऊन मिळाली असून सोमवारी (७ नोव्हेंबर) पुन्हा दालनात लावण्यात येईल. – विजय शिंदे, व्यवस्थापक, बालगंधर्व रंगमंदिर



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply