पुणे : उत्तरेकडे थंडीचा कहर, राज्यात ढगाळ स्थिती, दोन दिवसांनंतर तापमान घट

पुणे : उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या काही भागांत पश्चिमी चक्रवाताचा परिणाम म्हणून थंडीची तीव्र लाट आली असून, दाट धुक्यानेही कहर केला आहे. महाराष्ट्रात मात्र विदर्भ वगळता सर्वत्र किमान तापमान ढगाळ स्थितीमुळे सरासरीपुढेच असल्याने थंडी आटोक्यातच आहे. विदर्भातील काही भागांत तापमानात मोठी घट झाली असून, ती आणखी एक-दोन दिवस कायम राहणार आहे. त्याचप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रात दोन-तीन दिवसांनंतर तापमानात घट होऊन गारवा वाढण्याची शक्यता आहे.

पश्चिमेकडून सध्या देशात एकापाठोपाठ एक पश्चिमी चक्रवात येत आहेत. त्यातूनच हिमालयीन विभागात सध्या बर्फवृष्टी होत आहे. त्याचा परिणाम म्हणून उत्तरेकडील काही राज्यांमध्ये थंडीची तीव्र लाट निर्माण झाली आहे. हरियाना, पंजाब, चंडीगड, दिल्ली, राजस्थान आदी राज्यांमध्ये थंडीची तीव्र लाट आहे. त्याच बरोबरीने बिहार, उत्तर प्रदेश ते मध्य प्रदेशापर्यंत थंडीच्या लाटेची स्थिती आहे. एकीकडे थंडीची लाट आली असताना पश्चिमी चक्रवाताच्या परिणामातूनच याच भागांत दाट धुके पसरत आहे. अशा स्थितीत थंड वाऱ्यांच्या प्रवाहांना महाराष्ट्राकडे येण्यास अडथळा निर्माण झाला आहे. केवळ मध्य प्रदेशातील वाऱ्यांच्या प्रभावातून विदर्भातील काही भागांत थंडीचा कडाका वाढला आहे.

महाराष्ट्राच्या विविध भागांत सध्या ढगाळ स्थिती तयार होत आहे. रात्री आणि दिवसाही ढगाळसदृश धुके आकाशात दिसून येत आहे. त्यामुळे दिवसाच्या तापमानात घट होऊन उन्हाचा चटका घटला आहे. मात्र, रात्री हवेतील उष्मा वातावरणातच राहत असल्याने किमान तापमानात मोठी घट होऊ शकलेली नाही. पुढील दोन दिवसांत उत्तरेकडील तापमानात काही प्रमाणात वाढ होणार आहे. त्याचबरोबरीने महाराष्ट्रातही ढगाळसदृश धुक्याचे मळभ दूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवसांनंतर राज्यातील किमान तापमानात काही प्रमाणात घट होण्याचा अंदाज आहे.

विदर्भातील तापमानात सध्या मोठी घट झाली आहे. गोंदिया येथे शनिवारी राज्यातील नीचांकी ७.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत हे तापमान तब्बल ५.६ अंशांनी कमी असल्याने ही थंडीच्या लाटेची स्थिती समजली जाते. नागपूर येथे सरासरीपेक्षा ३.३ अंशांनी कमी ९.९ अंश किमान तापमानाची नोंद झाली. अकोला, बुलढाणा वगळता विदर्भात सर्वत्र किमान तापमान सरासरीखाली आहे. ही स्थिती दोन दिवस राहणार आहे. उर्वरित ठिकाणी मध्य महाराष्ट्र किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ५ ते ६ अंशांनी वाढला आहे. मुंबईसह कोकण विभाग आणि मराठवाड्यातही किमान तापमान सरासरीपुढे गेले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply