पुणेकरांची कोंडीतून सुटका; नळ स्टॉप उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

पुणे : कर्वे रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू झाल्यापासून कोथरूड, वारजे परिसरातील नागरिकांना नळ स्टॉप चौकात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. मात्र,  (रविवारी) सायंकाळी या चौकातील उड्डाणपुलाचे उद्‍घाटन झाल्याने या रस्त्यावरील वाहनचालकांची अखेर कोंडीतून सुटका झाली. वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग कर्वे रस्त्यावरून जात असताना नळ स्टॉप येथील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न भविष्यात गंभीर होणार होता. त्यामुळे या चौकात उड्डाणपुलाची गरज असल्याचे समोर आले. यामध्ये मेट्रो आणि पुणे महापालिकेने एकत्र येऊन हा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला. यामध्ये महापालिकेने ६५.५ कोटी आणि महामेट्रोने १३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. स्वातंत्र्य चौक ते एनएसडीटी असा ५४२ मीटरचा हा दुमजली उड्डाणपूल आहे. या पहिल्या उड्डाणपुलावरून वाहने तर त्यावरून मेट्रो धावत आहे. गेल्या रविवारी (ता.६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोचे उद्‍घाटन झाल्यानंतर हा पूलही खुला होणे अपेक्षीत होते. मात्र, एक आठवडा उशिराने हा पूल सुर झाला आहे. डेक्कनकडून कोथरूड किंवा वारजेच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना आता नळस्टॉप चौकात सिग्नलवर थांबण्याची गरज पडणार नाही. तसेच कोथरूडकडून डेक्कनकडे जाणाऱ्या नागरिकांना एसएनडीटी येथून विधी महाविद्यालय रस्त्यावरून नळ स्टॉप चौकात येण्याची गरज नाही. त्यांना पौड फाट्यावरून थेट पूर्वीप्रमाणे नळस्टॉप चौकातील उड्डाणपुलाचा वापर करता येणार आहे. त्यामुळे लाखो वाहनचालकांना याचा दिलासा मिळाला आहे. या उड्डाणपुलाचे उद्‍घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, महामेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला अधिकारी यावेळी उपस्थित होते. उद्‍घाटनानंतर चंद्रकांत पाटील यांनी इ बाइकवरून उड्डाणपुलावरून महापौरांसोबत प्रवास केला. विधी महाविद्यालय रस्त्याला दिलासा महामेट्रो आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे गेल्या तीन वर्षापासून एसएनडीटी ते नळस्टॉप ही वाहतूक एसएनडीटीकडून विधी महाविद्यालय रस्त्यावर वळवली. यातील काही वाहने हे नळस्टॉप चौकात येत तर काही वाहने प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता व इतर रस्त्याने डेक्कनकडे जात होती. त्यामुळे या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी व गोंगाट वाढला होता. हा उड्डाणपूल सुरू होताच बहुतांश वाहतूक थेट कर्वे रस्त्याने डेक्कनकडे जाऊ लागली. त्यामुळे विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक कमी झाली. या सुधारणा आवश्‍यक - कोथरूडकडून डेक्कनकडे जाताना एसएनडीटीच्या कोपऱ्यावर वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे - उड्डाणपूल व कर्वे रस्ता खुला असल्याची माहिती पौड फाटा येथेच नागरिकांना माहिती होणे आवश्‍यक - त्यासाठी माहिती फलक लावावेत - कर्वे रस्त्यावरील पीएमटीचा बसथांबा पूर्ववत करणे आवश्‍यक - पीएमटी चालक अद्यापही विधी महाविद्यालय रस्त्यावरून नळस्टॉप चौकात येत आहेत -एसएनडीटीच्या कोपऱ्यावरील पूर्ण रस्ता डांबरीकरण करणे आवश्‍यक - कर्वेरस्त्यावरील दुभाजकाची कामे लवकर पूर्ण करावीत


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply