पिंपरी : विमानतळ पुरंदरऐवजी चाकणला करा; उद्योजकांच्या संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी : पुण्याचे नियोजित विमानतळ पुरंदरऐवजी चाकणला करण्याची मागणी ‘फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन’ या उद्योजकांच्या संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. औद्योगिक पट्टा असल्याने चाकण परिसरात विमानतळ झाल्यास अनेक परदेशी कंपन्या गुंतवणुकीसाठी पुढे येतील, असा दावा या संघटनेने केला आहे.

फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. चाकणला विमानतळ होणार होते. त्यामुळे अनेक मोठ्या उद्योगांनी चाकणला गुंतवणूक केली. चाकणलगत तळेगाव, रांजणगाव, पिंपरी चिंचवड आदी भागांत औद्योगिक वसाहती मोठ्या प्रमाणात आहेत. तळेगाव-चाकण हे अंतर १५ मिनिटांवर आहे. पोषण वातावरण असल्याने चाकणला विमानतळ झाल्यास परदेशी कंपन्या आकर्षित होऊन राज्यातील गुंतवणुकीत भर पडेल. त्याचा उद्योग क्षेत्रालाही फायदा होईल. मुंबई विमानतळाशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नसल्यामुळे अनेक उद्योग येण्यास अनुत्सुक आहेत. त्यादृष्टीने चाकणला विमानतळ सुरू करण्याबाबत विचार करावा, अशी मागणी भोर यांनी केली आहे. सरकारच्या सतत बदलत्या धोरणांमुळे परदेशी उद्योग द्विधा मनस्थितीत आहेत. योग्य पर्याय मिळाल्यास महाराष्ट्रात गुंतवणुकीस मोठी संधी निर्माण होऊ शकते, असेही निवेदनात म्हटले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply