पिंपरी : पैसे घेऊन परस्पर गाळेवाटप ; एका गाळ्यासाठी ५० हजारांचा भाव

चिखली कृष्णानगर येथील भाजी मंडई तसेच घरकुल योजनेतील गाळे वाटपात बेकायदेशीरपणे पिंपरी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले आहेत. मध्यस्थ व्यक्ती नेमून त्यांच्यामार्फत एका गाळ्यासाठी ५० हजार रूपये घेऊन गाळ्यांचे वाटप केले आहे, असा आरोप टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केला आहे. अशा अधिकाऱ्यांवर तसेच त्यांच्यासाठी पैसे गोळा करणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीच्या वतीने याबाबत चिखली पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे, फ क्षेत्रीय कार्यालयासमोर मोर्चा काढून तासभर धरणे आंदोलन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.यासंदर्भात कांबळे म्हणाले की, कृष्णानगर येथील भाजी मंडई तसेच घरकुलमध्ये खरे व्यवसाय करणाऱ्या कष्टकऱ्यांना गाळे वाटप करण्यात आले नाही. कारण त्यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवली. ज्यांचा या व्यवसायाशी काही संबंध नाही, त्यांना गाळे वाटप करण्यात आले आहे. मध्यस्थांनी प्रत्येक गाळेधारकाकडून ५० हजार रुपये वसूल केले असून ते संबंधित पालिका अधिकाऱ्याला पोचवले आहेत. अशा पध्दतीने गाळे वाटपात पैसे खाणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करावेत, अशी तक्रार करणारे निवेदन संघटनेच्या वतीने चिखली पोलिसांकडे देण्यात आले आहे.

पालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ व इतर अधिकाऱ्यांशी अनेकदा चर्चा केली. तरीही गरजूंना गाळे मिळत नाहीत. गाळेवाटपात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. असा उद्योग करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडू.- बाबा कांबळे, अध्यक्ष, टपरी, हातगाडी पंचायत



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply