पालख्या आज पंढरीत ; बाजीराव विहिरीजवळ माउलींचे गोल, तर तुकोबारायांचे उभे रिंगण

पंढरपूर: माउलीचे पालखी सोहळय़ातील चौथे आणि शेवटचे गोल रिंगण आणि उभे रिंगण बाजीराव विहिरीजवळ संपन्न झाले. तर दुसरीकडे तुकोबारायांच्या पालखीचे बाजीराव विहिरीजवळ उभे रिंगण उत्साहात पार पडले. आज म्हणजे शनिवारी सर्व संतांच्या पालख्या पंढरीत दाखल होणार आहेत. गेली दोन वर्ष सुनेसुने झालेले पंढरपूर आता भाविकांच्या भक्तिसागरात न्हाऊन निघणार आहे.

माउलीची पालखी भंडीशेगावमधील मुक्काम आटोपून पुढे मार्गस्थ झाली. वाखरी जवळील बाजीराव विहिरीजवळ माउलीच्या पालखी सोहळय़ातील शेवटचा गोल रिंगण सोहळा रंगला. या ठिकाणी पालखी सोहळय़ाव्यतिरिक्त भाविक दुपारपासून दाखल झाले. मोठय़ा लवाजम्यासह माउलीची पालखी रिंगणाच्या ठिकाणी पोहचली. त्या नंतर मोठय़ा दिमाखात माउलीचे अश्व रिंगणाच्या ठिकाणी आले. चोपदाराने इशारा करताच माउलीच्या अश्वाने दौड करत रिंगण पूर्ण केले. या नंतर जमलेल्या वैष्णवांच्या उत्साहाला उधाण आले. विविध खेळ, भारुड, नाचून आनंदोत्सव साजरा केला. या गोल रिंगणा नंतर त्याच ठिकाणी रस्त्यावर उभे रिंगण झाले. रस्त्याच्या दुतर्फा जमलेले भाविक आणि त्या मधोमध अश्वाची दौड. या क्षणाचे हजारो भाविक साक्षीदार झाले. या नंतर माउलीची पालखी वाखरी येथे विसावली, तर तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळय़ातील उभं रिंगण बाजीरावची विहीर येथे रंगलं. पंढरपूरपासून मोजक्याच अंतरावर असणाऱ्या तुकोबांच्या या रिंगण सोहळय़ाकरता वारकऱ्यांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती. आधी पताकाधारी, त्यानंतर डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला वारकरी, पखवाजवादक आणि वीणाधारी यांनी रिंगणात फेरी पूर्ण केली. त्यानंतर चोपदाराचा अश्व आणि तुकोबांचा अश्व यांनी रिंगण वेगात पूर्ण केलं. या नंतर तुकोबारायची पालखी वाखरी मुक्कामी पोचली.

वाखीर येथे उभे रिंगण होणार आहे. त्या नंतर सर्व संतांच्या पालख्या वाखरी येथे येऊन पंढरीकडे मार्गस्थ होतील. दोन वर्षांनंतर पंढरी पुन्हा गजबजणार आहे. विठू माझा लेकुरवाळा ..संगे भक्तांचा मेळा या अभंगा प्रमाणे पंढरी भक्तिसागरात न्हाऊन निघणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply