परळीत राष्ट्रवादीच्या सरपंचानं केलं राज ठाकरेंचं स्वागत; ५० फूट फुलांच्या हाराची जोरदार चर्चा!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज ( १८ जानेवारी ) बीडमधील परळी दौऱ्यावर आहेत. एका प्रकरणात परळी न्यायालयाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे परळीत दाखल झाले. यावेळी राज ठाकरेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे.

राज ठाकरे मुंबईतून सकाळी हेलिकॉप्टरने परळीकडे निघाले. औरंगाबादमध्ये काही काळ थांबत राज ठाकरेंनी विश्रांती घेतली. सुमारे १०.३० च्या सुमारास राज ठाकरेंचं परळीत आगमन झालं. राज ठाकरेंनी गोपीनाथ गड येथे गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. त्यानंतर न्यायालयात जाण्यापूर्वी राज ठाकरेंचं परळीत जंगी स्वागत केलं आहे.

राज ठाकरेंच्या परळी दौऱ्यानिमित्त मनसेकडून शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच, गोपीनाथ गड असलेल्या पांगरी ग्रामपंचायतीचे सरपंच सुशील कराड यांनी राज ठाकरेंच्या स्वागतासाठी १० क्विंटल आणि ५० फुट फुलांचा हार तयार केला होता. तसेच, जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. सुशील कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे गटाचे सरपंच आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या सरपंचाने राज ठाकरेंचं स्वागत केल्याने याची सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.

२२ ऑक्टोंबर २००८ साली राज ठाकरेंना अटक झाली होती. या अटकेचे राज्यभर पडसाद उमटले होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी परळी तालुक्यात अनेक ठिकाणी तोडफोड केली होती. परळी-गंगाखेळ रोडवरच्या धर्मापुरी फाटा येथे एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक करून तोडफोड केली. या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार देण्यात आली होती. याच प्रकरणात परळी न्यायालयाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. त्यानुसार राज ठाकरे आज ( १८ जानेवारी ) परळी न्यायालयात हजर झाले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply