नॅशनल हेराल्ड प्रकरण : सोनिया गांधींना ‘ईडी’ने चौकशीसाठी बोलवल्याच्या निषेधार्थ, पुण्यात काँग्रेसचे आंदोलन

नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांना समन्स बजावलेले आहे. आज(गुरुवार) सोनिया गांधी चौकशीसाठी ‘ईडी’ कार्यालयात हजर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने देशव्यापी आंदोलन पुकारले असून, पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर देखील केंद्र सरकार विरोधात काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विश्वजीत कदम, सत्तेज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह पक्षाचे आजीमाजी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

“केंद्रात भाजपाची सत्ता येऊन सात वर्ष झाली आहेत. या काळात सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यावरून नागरिकांचे मन विचलित करण्यासाठी देशभरातील विरोधकांच्या ईडी, सीबीआय मार्फत चौकशी लावली जात आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी नोटीस बजावून हजर होण्यास लावले आहे. या गोष्टींचा आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत, यातून केवळ दबाव आणून सर्व सामान्य नागरिकांमध्ये काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचे काम हे सरकार करीत आहे. भाजपाला एवढंच वाटत असेल तर त्यांनी कोर्टात जावे, आम्ही तिथे आमची बाजू मांडू.” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

तसेच “अनेक राज्यात ईडी, सीबीआय या यंत्रणांचा दबाव आणून सरकार पाडण्याचं काम भाजपाने केले आहे. आपल्या येथील महाविकास आघाडी सरकार देखील अशाच पद्धतीने पाडले गेले आहे. पण हे प्रकरण न्यायालयात असून शिंदे गटातील सर्व आमदारांचे निलंबन अटळ आहे.” असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

याशिवाय ते पुढे म्हणाले की, “आपल्या देशातील जनते समोर महागाई, बेरोजगारी,शिक्षण असे प्रश्न असताना. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाही. आज शेजारील राष्ट्रात महागाई वरून जी परिस्थिती निर्माण झाली आहे. ती भविष्यात आपल्या येथे देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच केंद्र सरकारने पाऊल उचलावी.” अशी मागणी त्यांनी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply