नाशिक पोलिसांकडून भोंग्यांचे डेसिबल मोजण्यास सुरुवात; सोशल मीडियावरही असणार वॉच

नाशिक: राज्यात भोंग्यांबाबत राजकारण तापलं असताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नाशिक पोलिसांनी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. नाशिक जिल्ह्यातील मशिदींसह इतर धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या आवाजाचे प्रमाण (डेसिबल) मोजण्यास नाशिक ग्रामीण पोलिसांकडून सुरुवात झाली आहे. नाशकातील सय्यद पिंप्री गावात पोलिसांनी मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाचे प्रमाण मोजले आहे. दिवसा 55 डेसिबल तर रात्री 45 डेसिबल पेक्षा जास्त आवाज असल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर खबरदारी म्हणून नाशिक ग्रामीण पोलिसांनी उपाययोजना सुरू केली आहे. 

नाशिकच्या मालेगावसह जिल्ह्यातील सर्वच शहरांमधील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या आवाजाचे प्रमाण मोजण्यास सुरुवात झाली आहे. प्रदूषण नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून पाहणी करण्यात आली. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आवाजाचे प्रमाण अधिक आढळल्यास गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रमाणे संभाव्य धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं सायबर सेल सक्रिय झालं असून जिल्ह्यातील सोशल मीडियावर ग्रामीण पोलिसांचा वॉच असणार आहे.

दरम्यान महाराष्ट्राचे डीजीपी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुमारे तासभर बैठक झाली. कुठल्याही कार्यक्रम किंवा धार्मिक सणांसाठी स्पिकर लावण्यापूर्वी सर्वांना परवानगी घ्यावी लागेल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. परिस्थितीनुसार नियमांचे पालन करण्याचे स्वातंत्र्य पोलिस महासंचालकांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पोलिस अधिकारी यांना दिले आहे. लवकरच डीजीपी कार्यालयाकडून एक सामान्य मार्गदर्शक सूचना जारी केली जाईल जी संपूर्ण महाराष्ट्रात लागू असेल. जिल्ह्यातील परिस्थिती पाहून नियम कठोर किंवा सौम्य ठेवण्याचे नियम बैठकीत ठरवण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply