नाशिक : नदी प्रदूषण मुक्तीसाठी; कोविड सेंटरमधील ऑक्सिजन प्लांट

नाशिक : शहरात कोरोना रुग्णसंख्या शून्यावर आल्यानंतर महापालिकेने आता कोव्हिड सेंटर गुंडाळण्याची तयारी केली असून, यापूर्वी करोडो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले ऑक्सिजन प्लान्टचा योग्यरितीने वापर होण्यासाठी गोदावरी व उपनद्यांच्या प्रदूषणमुक्ती ऑक्सिजन उपयोगात आणला जाणार आहे. मलनिस्सारण केंद्रातील सांडपाण्यावर ऑक्सिनायझेशनची प्रक्रिया केली जाणार आहे. कोरोना तिसरी लाट जवळपास संपुष्टात आली आहे. मंगळवारी (ता. १५) शहरात एकही रुग्ण आढळून न आल्याने वैद्यकीय विभागाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तिसरी लाट ओसरल्याने महापालिकेकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या उपाययोजना गुंडाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना तिसऱ्या लाटेत कमतरता भासू नये यासाठी प्रशासनाने अन्य बाबीवरचा खर्च कमी करून वैद्यकीय व्यवस्थेवरचा खर्च वाढविला. कोरोना पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या लाटेमध्ये एकूण १९ लाख ५२ हजार ७४५ संशयित रूग्ण आढळले. त्यातील दोन लाख ७२ हजार ७०० रुग्ण बाधित आढळले. बाधितांपैकी चार हजार १०५ जणांचा मृत्यू झाला. जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरवात झाली. जानेवारी महिन्यात तिसरी लाट येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने कोरोना उतरणीला लागला. २३ जानेवारीला दैनंदिन रुग्णसंख्येने दोन हजारांचा टप्पा ओलांडला. सक्रिय रुग्णसंख्या १०, ९४८ पर्यंत पोचली होती, तर पॉझिटिव्हिटीचा दर ३९ टक्क्यांपर्यंत होता. परंतु, आता हाच दर आता शून्यावर आला आहे. शहरात शून्य रुग्णसंख्या झाल्याने नवीन बिटको व डॉ. झाकिर हुसैन रुग्णालयाचा कोव्हिड दर्जा काढून घेण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुदतवाढ नाकारण्यात आली, लसीकरण केंद्रे कमी करण्यात आली. डेटा एन्ट्री ऑपरेटर निवडणूक कामासाठी वर्ग करण्यात आले. नव्याने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लान्टचा नदी शुद्धीकरणासाठी उपयोग केला जाणार आहे. कोव्हिड सेंटरसाठी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प (पीएसए) उभारण्यात आला होता. महापालिकेने सीएसआर फंड व स्वखर्चातून २२ पीएसए प्लान्ट उभारले. तिसरी लाट ओसरल्याने कोविड सेंटर बंद केली जाणार आहे. ऑक्सिजनचा उपयोग ओझोनायझेशन प्रक्रियेसाठी केला जाणार आहे. नदीच्या पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण वाढून प्रदूषणाची पातळी कमी होत असल्याने तेथे उपयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिटको व झाकिर हुसेन रुग्णालय वगळता इतरत्र बसविण्यात आलेले पीएसए प्लान्ट काढून मलनिस्सारण केंद्रांमध्ये बसविण्याच्या सूचना पालिका प्रशासक कैलास जाधव यांनी दिल्या. नैसर्गिक नाल्यांवर प्लांट महापालिकेने कोव्हिड काळात बावीस पीएसए प्लान्ट उभारले होते. सर्व प्लान्ट नैसर्गिक नाले व मलनिस्सारण केंद्राच्या ठिकाणी स्थलांतरित केले जाणार आहे. गोदावरी नदीच्या शहरातील १९ किलोमीटरच्या प्रवासात बावीस ठिकाणी पीएसए प्लान्ट स्थलांतरित केले जाणार आहे. ऑक्सिजनच्या माध्यमातून पाण्यातील ऑक्सिजन पातळी (बायोमेडिकल ऑक्सिजन डिमांड) वाढवून पाणी शुद्धीकरण केले जाणार आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply