नागपूर : साडेपाच लाख नागरिकांची ‘दुसऱ्या’ डोससाठी टाळाटाळ

नागपूर : राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने महापालिकाही सावध झाली आहे. परंतु अद्यापही १८ वर्षांवरील पात्र नागरिकांपैकी साडेपाच लाख नागरिकांनी दुसरा डोस घेतला नाही. त्यामुळे महापालिकेच्या चिंतेत भर पडली असून दिल्ली व उत्तर भारतातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन्ही डोस घेउन ९ महिन्याचा कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांना बुस्टर डोस देण्यात येत आहे. लसीकरणाच्या सुरवातीच्या काळात आरोग्य सेवक, फ्रंट लाईन कर्मचारी, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि व्याधी असलेले १८ ते ५९ वर्ष वयोगटातील नागरिकांना प्राधान्याने बुस्टर डोस देण्यात आला. आतापर्यंत ८५९३२ जणांनी बुस्टर डोस घेतला. परंतु शहरातील १२ वर्षांवरील एकूण पात्र २१ लाख ८९ हजार २५ नागरिक, मुलांपैकी १६ लाख ४३ हजार ८७२ नागरिकांनीच दुसरा डोस घेतला.

अर्थात अजूनही ५ लाख ४५ हजार १५३ नागरिक दुसऱ्या डोसपासून वंचित आहे. किंबहुना ते टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. बाहेरगावातील नागरिकांनीही नागपुरात पहिला डोस घेतल्यामुळे पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या २० लाख ५० हजार ५६४ एवढी आहे. शहरात लसीकरणासाठी पात्र असलेल्या १२ वर्षावरील सर्वांचे (१२ ते १४, १५ मे १७, १८ वर्षावरील सर्व) पहिल्या डोसचे ९८.८४ टक्के तर दुसऱ्या डोसचे ७८.०६ टक्के लसीकरण झाले आहे. कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसऱ्या डोसला मिळणारा प्रतिसाद कमी असल्याने महापालिकेच्या चिंतेत भर पडली आहे. दिल्ली व उत्तर भारतात मोठ्या संख्येने कोविड रुग्ण वाढत आहे.

त्यामुळे महापालिकेने दुसऱ्या डोसपासून वंचित असलेल्या नागरिकांना तत्काळ लसीकरणाचे आवाहन केले आहे.शहरात १८ वर्षावरील सर्वांना कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे लसीकरण केले जात आहे. १५ ते १७ वर्ष वयोगटासाठी कोवॅक्सिन आणि १२ ते १४ वर्ष वयोगटासाठी कोर्बेव्हॅक्सचे लसीकरण करण्यात येत आहे. शाळांमध्ये १२ ते १४ वर्ष वयोगटाच्या मुलांसाठी लसीकरण सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply