नवी दिल्ली : ‘उत्तर भारतीयांची माफी मागा ! अन्यथा राज ठाकरेंना अयोध्यात घुसू देणार नाही’ : भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह

नवी दिल्ली : उत्तर भारतीयांवरील टीकेवरून हिंदुत्वाच्या भूमिकेकडे वळलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात भाजप नेते पुढे येत आहेत. उत्तर प्रदेश व बिहारच्या लोकांवर मनसेच्या लकांनी केलेल्या हल्ल्यांबद्दल व त्यांच्या अपमानाबाबत ठाकरे यांनी हात जोडून या राज्यांंसह संपूर्ण उत्तर भारताच्या जनतेची जाहीर माफी मागावी. माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी दिला आहे. राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. राम मंदिर आंदोलनाशी ठाकरे परिवाराचा काही संबंध नाही व त्यांना याचे देणेघेणे नाही असाही हल्लाबोल ब्रिजभूषण यांनी केला असून जोवर ठाकरे उत्तर भारतीयांच्या लोकांची माफी मागत नाहीत तोवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना किंवा ठाकरे परिवारालाही अजिबात भेटू नये असेही त्यांनी आवाहन केले आहे.

सिंह हे केसरगंज, अयोध्या भागातील प्रभावी खासदार मानले जातात. उत्तर प्रदेशात मशिदींवरील भोंगे उतरविल्याबद्दल राज ठाकरे यांनी आदित्यनाथ यांचे नुकतेच जाहीर कौतुक केले होते. महाराष्ट्रातही तसे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते कालपासून आक्रमक झाले आहेत. ठाकरे यांच्या घोषणेचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटले व दिल्ली भाजपने हीच मागणी लावून धरली. भाजपचे महाराष्ट्रातील नेतृत्व राज ठाकरे यांच्याशी युती करण्याबाबत अनुकूल आहे. मात्र लोकसभेची चावी मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश व बिहारमधील (१२० खासदार) भाजप नेत्यांमध्ये ठाकरे यांच्याशी युती करण्याचा विचार भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने करू नये असा जोरदार मतप्रवाह आहे.

भाजपमध्ये सध्या संवेदनशील राजकीय भूमिकेबाबत कोणी जाहीरपणे बोलण्याचे धाडस दाखवत नाही. मात्र ब्रिजभूषण यांनी राज ठाकरे यांच्याबाबत रोखठोक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे व ठाकरे परिवार यांनी उत्तर भारतीयांवर केलेले अन्याय या भागातील भूमिपुत्र विसरूच शकत नाहीत असा मतप्रवाह या राज्यांतील भाजप खासदारांमध्येही सर्रास आढळतो. ब्रिजभूषण यांनी आज ट्विट करून सांगितले की, उत्तर भारतीयांना अपमानित करणाऱ्या राज ठाकरे यांना अयोध्येत घुसू देणार नाही. अयोध्येत पाय ठेवण्याआधी त्यांनी उत्तर भारतीयांची हात जोडून जाहीर माफी मागितली पाहिजे.

दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणतात की जोवर राज ठाकरे माफी मागत नाहीत तोवर मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटूही नये. राम मंदिर आंदोलनापासून भव्य मंदिराच्या निर्मितीचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिन्दू परिषद व सर्वसामान्य जनतेचे आहे. त्यांचीच यात मुख्य भूमिका आहे. या ठाकरे परिवाराला या साऱ्या आंदोलनाशी काही देणे-घेणे नाही.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply