दहशतवादाचे वर्गीकरण होऊ शकत नाही -गृहमंत्री शहा

पीटीआय, नवी दिल्ली : ‘‘दहशतवादामुळे मानवी हक्कांचे मोठय़ा प्रमाणात उल्लंघन होते. सीमेपलीकडून दहशतवादाला मिळणारे आश्रयस्थान आणि उत्तेजन रोखण्यासाठी जागतिक पोलीस संघटनेने (इंटरपोल) आंतरराष्टीय सहकार्य मिळवावे. गुन्हेगारी टोळय़ा परस्पर संबंध राखून समन्वयाने काम करत आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून जागतिक पोलीस संघटना (इंटरपोल) व गुप्तचर संस्थांनी एकजुटीने सहकार्याने काम केले पाहिजे,’’ असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे शुक्रवारी केले.

  दिल्लीत झालेल्या ‘इंटरपोल’च्या ९० व्या महासभेच्या अखेरच्या दिवशी संबोधित करताना शाह बोलत होते.  ‘इंटरपोल’च्या महासभेत १६४ देशांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना गृहमंत्री शहा म्हणाले, की चांगला दहशतवाद-वाईट दहशतवाद, छोटा-मोठा दहशतवाद असे वर्गीकरण होऊ शकत नाही. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नवी दिल्लीत ‘इंटरपोल’ महासभा आयोजित केली होती. शहा म्हणाले, की गुन्हेगारीच्या सध्याच्या घटनांना सीमांचे बंधन नाही. या आंतरराष्ट्रीय आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्व ‘इंटरपोल’ सदस्यांनी एकत्र आले पाहिजे. या समस्यांना तोंड देण्यासाठी ‘इंटरपोल’ची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

‘ऑनलाइन’ माध्यमातून दहशतवादाचा प्रसार केला जातो, असे सांगून शहा म्हणाले, की याला केवळ राजकीय समस्या म्हणून दुर्लक्ष केले तर त्याविरुद्धचा लढा अधुरा राहील. मोदी यांचे सरकार पोलिसांना सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतात दहशतवाद आणि अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणांची राष्ट्रीय स्तरावरील अद्ययावत माहिती तयार करत आहे. या माहितीचा उपयोग करून पोलिसांना या घटना व गुन्ह्यांना प्रभावीपणे रोखता येईल. नागरिकांच्या सुरक्षेला पोलीस दलाकडून सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply