ठाणे शहरात ४३ अंश तापमानाची नोंद; उष्माघातापासून बचाव करण्याचे आवाहन

ठाणे : मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ठाणे जिल्ह्यात उष्मालहरीचा तडाखा बसू लागला आहे. ठाणे शहरात आज दुपारी तीन वाजता ४३ अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्यावतीने  देण्यात आली; तर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना उष्माघातापासून बचाव करण्यासाठी दुपारी बारा ते चार या दरम्यान शक्यतो घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, रायगड, पालघरसह ठाणे जिल्ह्यातही १६ मार्चपर्यंत उष्ण लहरीचा (हीटवेव्ह) तडाखा बसण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यात सोमवारी (१४ मार्च) सकाळपासूनच वातावरणात उष्णता जाणवू लागली होती; तर दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान ठाणे शहरातील ४३ अंश तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत होती. अनेक चाकरमान्यांनी आपला मोर्चा ताक, नारळ पाणी, लिंबू सरबताच्या गाडीवर वळविला असल्याचे दिसून आले. त्यानुसार उष्माघातापासून बचाव करण्याकरिता नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. कल्याणमध्ये ४१ अंश तापमान कल्याण, ता. १४ (बातमीदार) : कल्याणमध्ये सोमवारी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील काही दिवस कल्याण व डोंबिवलीत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या वाढत्या उकाड्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्‍भवण्याचा धोका वाढत आहे. पोटाचे एक्स-रे, सोनोग्राफी अशा तपासण्या वाढल्या आहेत, अशी माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली. नागरिकांनी दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणे टाळावे. तहान नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलके, पातळ व सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना सनग्लासेस, स्कार्फ, छत्री, टोपी यांचा वापर करावा. प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी, ओल्या कपड्याने डोके, चेहरा झाकावा. - डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply