“गुजरातची निवडणूक जिंकण्यासाठी महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प एकापाठोपाठ एक नेले जात आहेत ”, ‘टाटा एअरबस’वरून रोहित पवारांनी सरकारला घेरलं; म्हणाले, “महाराष्ट्राच्या युवांचं भवितव्य चिरडलं जातंय”

वेदान्त-फॉक्सकॉन’ आणि ‘बल्क ड्रग पार्क’ हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला काही दिवसांपूर्वीच गेला होता. त्यात आता ‘टाटा-एअरबस’च्या रुपाने आणखी एक प्रकल्प हातातून गेला आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत तीन प्रकल्प गुजरातला गेले आहेत. त्यात २२ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प गुजरातला गेल्याने पुन्हा एकदा राजकीय वादंग निर्माण झाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हे ‘हे महाराष्ट्र सरकारचं अपयश नाही तर गुजरात सरकारचं यश आहे’, असे म्हणत सरकारला टोला लगावला आहे.

रोहित पवार यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या एका विधानाचा संदर्भ घेत ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये ते म्हणतात, “ज्याप्रमाणे रुपया कमजोर होत नसून डॉलर मजबूत होत आहे, त्याचप्रमाणे टाटा एअरबसचा २२ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणं हे महाराष्ट्र सरकारचं अपयश नाही तर गुजरात सरकारचं यश आहे.”

“गुजरात विधानसभेची निवडणुक जिंकण्यासाठी महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प एकापाठोपाठ एक नेले जात आहेत. यामुळं ती निवडणूक भाजपा कदाचित जिंकेलही, परंतु या खेळात महाराष्ट्राच्या युवांचं भवितव्य चिरडलं जातंय आणि सर्वच राज्यकर्ते मात्र आपल्याच धुंदीत आहेत, हे दुर्दैव आहे,” अशी खंतही रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनीही टाटा एअरबस गुजरातला गेल्यावरून टीका केली आहे. “कदाचित वेदान्त फॉक्सकॉनप्रमाणेच या प्रकल्पचाहीही उद्योग मंत्र्यांना माहिती नसावी. असा एमओयू जर झाला होता, तर काहीही करून एयरबसचा प्रकल्प राज्यात आणू, असे उद्योग मंत्र्यांनी का सांगितले होते? त्यांनी राज्यातील युवकांची फसवणूक का केली? का ते खोटं बोलले? मग इतके महिने ते शांत का होते? याची उत्तरं मिळायला हवी”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply