कोणाला निष्ठेचे फळं मिळणार, कोणाची नाराजी दूर होणार; शिंदे गटाकडून स्वीकृत पदाच्या लॉटरीसाठी 2 नावं चर्चेत, कोणाला लॉटरी?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा धुरळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने राजकीय पुनर्वसनाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबईत २९ जागांवर विजय मिळवला. या नियमानुसार त्यांच्या वाट्याला दोन स्वीकृत नगरसेवक (Nominated Corporators) पदे आली आहेत. या दोन जागांसाठी आता पक्षांतर्गत मोठी चुरस निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांचे सुपुत्र राज सुर्वे आणि बोरिवलीचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद या दोघांची नावे या जागांसाठी आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नाराजी दूर करण्यासाठी पक्षाची खेळी?

मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी आपले सुपुत्र राज सुर्वे यांच्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. प्रभाग क्रमांक ५ मधून राज सुर्वे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता होती. मात्र ऐनवेळी या ठिकाणी माजी उपमहापौर संजय घाडी यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे सुर्वे समर्थक आणि स्वतः प्रकाश सुर्वे हे काही काळ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. ही नाराजी दूर करण्यासाठी आणि आगामी समीकरण लक्षात घेता प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाऊ शकते.

बाळकृष्ण ब्रीद यांना निष्ठेचे फळ मिळणार?

तर दुसरीकडे, बोरिवलीचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांचे नावही चर्चेत आहे. गेल्या निवडणुकीत पक्षाने त्यांना एबी फॉर्म (AB Form) दिला होता, मात्र तांत्रिक त्रुटींमुळे त्यांना आपला उमेदवारी अर्ज वेळेत भरता आला नव्हता. अर्ज भरता न आल्याने त्यांनी पक्षाने दिलेला फॉर्म अपक्ष उमेदवाराला देऊन पक्षादेशाचे पालन केले होते. पक्षाशी असलेली हीच निष्ठा आणि तांत्रिक कारणामुळे हुकलेली संधी विचारात घेतली जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच ब्रीद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान स्वीकृत नगरसेवक पदासाठी केवळ हे दोनच चेहरे नव्हे तर अनेक माजी नगरसेवक आणि पराभूत उमेदवारांनी एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी चकरा मारण्यास सुरुवात केली आहे. प्रभागनिहाय समीकरणे आणि आगामी मुंबईच्या राजकारणात पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी कोणाला संधी द्यायची, याचा अंतिम निर्णय मात्र एकनाथ शिंदे घेणार आहेत. या स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ आणि अत्यंत निष्ठावंत नेते माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी प्रबळ दावेदारी सादर केली आहे. त्यामुळे आता कोणाच्या नावाची वर्णी लागणार हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

एकीकडे शिंदे गटात खलबते सुरू असताना, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाने साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे. यामुळे आता शिंदे गटाकडून कोणती दोन नावे समोर येतात, याकडे मुंबईच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *