पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्य नगरीत एमबीबीएस’ला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने 13 जणांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार

 

पुणे : पुणे महापालिकेच्या मंजुरी मिळालेल्या वैद्यकीय महाविद्यालयासह राज्याच्या वेगवेगळ्या भागातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाला (एमबीबीएस) प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने 13 पालकांची तब्बल अडीच कोटी रुपयांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. विमाननगर परिसरात संस्थेचे कार्यालय थाटून फसवणुकीचा प्रकार करण्यात आला. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात तिघांसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रशेखर देशमुख, राजेंद्र कुशवाह, पारस शर्मा व त्यांच्या साथीदारांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नगरमधील नेवासा येथील एका पालकाने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्यासह 12 जणांची या प्रकरणामध्ये फसवणुक झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मुलाने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्‍यक "नीट'ची परीक्षा दिली होती. त्यानुसार, आरोपींनी फिर्यादी व त्यांच्याप्रमाणे अन्य पालकांचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधला.

त्यांच्या मुलांना पुणे महापालिकेकडून लवकरच सुरु करण्यात येणाऱ्या "भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय', नाशिक येथील "एसएनडीटी' वैद्यकीय महाविद्यालयासह राज्याच्या वेगवेगळ्या भागातील वैद्यकीय महाविद्यालयात "एमबीबीएस'च्या अभ्यासक्रमाला महाविद्यालयाच्या व्यवस्थापन कोट्यातुन प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार, फिर्यादी यांच्याप्रमाणेच 12 पालकांशी चंद्रशेखर देशमुख यांनी संपर्क साधला.

फिर्यादीच्या मुलाला महापालिकेच्या अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवुन देण्यासाठी 30 लाख 72 हजार रुपये त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतली. त्याप्रमाणे अन्य पालकांकडूनही 20 लाखांपासून ते 30 लाख रुपयांपर्यंतची रक्कम घेतली. अशी 13 जणांकडून तब्बल दोन कोटी 53 लाख 17 हजार 559 रुपये त्यांनी घेतले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या मुलाला बनावट पत्रही दिले. त्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन चौकशी केली, तेव्हा त्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यानुसार त्यांच्यासह अन्य पालक तेथे आले, त्यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

देशमुख, कुशवाह व शर्मा यांनी विमाननगर परिसरामध्ये शिक्षा सेवा इंडिया हि संस्था सुरु केली. याच संस्थेच्या कार्यालयामध्ये फिर्यादीसह अन्य पालकांना बोलावुन त्यांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पालकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला, मात्र त्यांचे मोबाईल क्रमांक बंद होते. त्यामुळे पालकांनी कार्यालयाकडे धाव घेतली.तेव्हा, संबंधित कार्यालयालाही टाळे लागल्याचे दिसून आले. फिर्यादी यांच्याप्रमाणे सांगोला, पंढरपुर, पुणे, जळगाव येथील पालकांचीही फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply