“आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी, शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही”; जाहीर भाषणात चंद्रकांत पाटलांचं विधान

पुणे : राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा गुरुवारी पुण्यामध्ये सत्कार करण्यात आला. पुण्याच्या पालकमंत्री पदावर पाटील यांची निवड झाल्याने पुणे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभाच्या भाषणात बोलताना चंद्रकांत पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत एक विधान केलं. मोदी आणि शाह यांना शिव्या घातलेल्या चंद्रकांत पाटलांना चालणार नाही. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी आणि शाहांना शिव्या दिलेल्या चालणार नाही असं एका नेत्याने आपल्याबद्दल शेतकरी संघटनेचे नेते असणाऱ्या राजू शेट्टी यांना सांगितल्याचा दावा चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी भाषणाच्या सुरुवातीला आयोजकांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यानंतर कोथरुड मतदारसंघामधून पाटील यांनी देण्यात आलेली संधी आणि त्यावरुन झालेला वाद याबद्दल भाष्य केलं. पक्षाने काहीतरी विचार करुन आपल्याला या मतदारसंघातून उमेदवारी दिल्याचा दावा करताना पाटील यांनी यापूर्वी आपण सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमध्ये काम केल्याचा दाखला दिला. आपल्या नेतृत्वाखाली कशाप्रकारे आपण विरोधकांना पराभूत केलं यासंदर्भात माहिती सांगताना पाटील यांना हातकणंगले मतदारसंघातील निवडणूक आणि त्यावेळी झालेल्या आरोप प्रत्यारोपांचा उल्लेख केला. या निवडणूक प्रचारामध्ये राजू शेट्टी हे अनेकदा पंतप्रधान मोदींना शिवागाळ करत होते असा दावा पाटील यांनी केला. मात्र आपण शेट्टींना सव्वा लाख मतांनी हरवलं असं चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील राज्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असल्याचा हा काळ होता. त्याचा संदर्भ देत ते बोलत होते.

“२०१९ ला काय उचललं मला आणि आणलं पुण्याला असं झालं नाही. यामागे काहीतरी नियोजन असणार. करोनामुळे आणि सरकार गेल्याने हे नियोजन अर्धवट राहिलं आहे. ते पूर्ण करायचं आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर साफ झालं. माढा पवार उभे राहणार होते. काय झालं? नाही उभे राहिले. रणजित निंबाळकर विजयी झाले. ८४ हजार मतांनी जिंकले. हातकणंगल्यात रोज उठून आमचे शेट्टी शिव्या द्यायचे. रोज उठून मोदींना शिव्या. माझे खूप चांगले मित्र आहेत. म्हटलं तुम्ही चूक करताय. ते अशा भावनेत होते की मला कोण हरवणार. सव्वा लाख मतांनी हारवलं त्यांना,” असं पाटील म्हणाले.

पुढे पाटील यांनी शेट्टी आणि भाजपाच्या एका केंद्रीय मंत्र्याच्या भेटीमधील चर्चेसंदर्भात सांगितलं. “परवा आपल्या एका केंद्रीय नेत्याची आणि त्यांची भेट झाल्यानंतर ते म्हणाले की दादांनी मला संपवलं. ते केंद्रीय नेते ४० वर्ष माझ्याशी जोडलेले असल्याने म्हणाले की दादा कोणाला संपवत नाही. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल. ते म्हणतील जाऊ दे. आईवरुन शिव्या देणं आमची कोल्हापूरची पद्धत आहे. पण दादा (चंद्रकांत पाटील) मोदी आणि शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही. नशीब पाडला. बाकी काही करायचा त्याचा स्वभाव नाही,” असं विधान चंद्रकांत पाटील आपल्याबद्दल चर्चा झाल्याचं सांगताना केलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply