अमरावती : उदयपूर आणि अमरावतीतील घटनेचा हेतू एकच; अमरावती पोलीस आयुक्तांची माहिती

अमरावती : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केल्याच्या रागातूनच पशूवैद्यक व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली असून उदयपूर आणि अमरावतीतील घटनेचा हेतू एकच असल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अमरावती आणि उदयपूर येथील घटनेत कोणत्या समानता आहेत, याचा तपास केला जात आहे. मुख्य सूत्रधार इरफान खान  याच्या स्वयंसेवी संस्थेची देखील चौकशी केली जात आहे. इरफान खानचा कुठल्या संघटनांशी संबंध आहे, त्याच्या संस्थेला परकीय निधी मिळाला आहे का, याचाही तपास केला जात असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

या हत्या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने सुरू होता. हे अत्यंत संवेदनशील प्रकरण असल्याने अर्धवट माहिती दिल्यास वातावरण बिघडण्याचा धोका ओळखून पोलिसांनी केवळ माध्यमांना संपूर्ण माहिती दिली नाही. याचा अर्थ हे प्रकरण पोलिसांनी दडपले असा होत नाही. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपल्यावर केलेले आरोप खोटे आहेत. महापालिका आयुक्तांवरील हल्ल्याच्या घटनेनंतर आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, तेव्हापासून वैयक्तिकरीत्या आरोप केले जात आहेत, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.

या प्रकरणाचा तपास आज सोमवारी रात्री किंवा मंगळवारी सकाळी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्यात येणार असून अमरावती पोलीस यंत्रणेला तपासात सहकार्य करणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply