सोलापूर : ऊसतोड कामगारच दरोडेखोर! गाडी भाड्यासह झालेला खर्च काढण्यासाठी शिजविला दुसरा प्लॅन

सोलापूर : बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) जवळील हिरजे वस्तीवर दरोडा टाकून बाबुराव हिरजे यांचा खून करून त्यांच्या घरातून 75 हजारांचा मुद्देमाल लुटून नेणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील आठपैकी सहाजणांना ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते सर्वजण ऊसतोड कामगार असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी दर्गनहळ्ळी परिसरात ऊसतोड केली आहे. त्यावेळीच पाटील यांच्या घरावर दरोडा टाकण्याचे ठरविल्याची माहिती समोर आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दर्गनहळ्ळी रोडवरील हिरजे यांच्या वस्तीवर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा वैभव उर्फ भोरड्या एकनाथ काळे (रा. फकराबाद, जि. नगर) हा म्होरक्‍या आहे. अजयदेवगण उर्फ देवगण सपा शिंदे, सुनिल उर्फ गुल्या सपा शिंदे (दोघेही रा. शेळगाव, ता. परांडा), ज्ञानेश्‍वर लिंगु काळे (रा. पांढरेवाडी, ता. परांडा), विकास नागेश भोसले (रा. डोकेवाडी, ता. भूम) हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. संतोष झोडगे (रा. डोकेवाडी, ता. भूम) हा त्यांना घेऊन आलेल्या गाडीचा चालक आहे. झोडगे याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर काळे आणि देवगण व गुल्या या दोघांची पोलिस कोठडी उद्या (सोमवारी) संपणार आहे. त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. एकाला नगर, दुसऱ्याला बीड तर दोघांना लोणीकाळभोर आणि एकाला भूम येथून अटक करण्यात आली. दरम्यान, ज्ञानेश्‍वर काळेची पोलिस कोठडी 24 मार्चपर्यंत असून विकास भोसले याला आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे. दरम्यान, अक्षय काळे रा. पिंपळगाव, ता. जामखेड आणि अनुज उर्फ नागनाथ भोसले (रा. डोकेवाडी, ता. भूम) यांचा शोध सुरु आहे. दरम्यान, परजिल्ह्यातून ऊसतोड कामगार सोलापूर जिल्ह्यात आल्यानंतर त्या त्या पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारांकडून त्या सर्वांची नावे आणि मोबाइल क्रमांक घ्यावेत, अशा सूचना यापूर्वीच पोलिस अधीक्षकांनी दिल्या आहेत. ग्राम सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्यासाठीही प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply