MNS Foundation Day : आज मनसेचा वर्धापन दिन, पुण्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत होणार मेळावा

दरवर्षी मनसेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम हा मुंबईत होत असतो. मात्र, यावेळी होणारा कार्यक्रम हा पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच याठिकाणी होत आहे.

MNS Foundation Day : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन आहे. आज मनसेची स्थापना होऊन 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2006 ला राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. दरम्यान, यावेळी होणारा वर्धापन दिनाचा मेळावा विशेष असणार आहे. याचं कारण म्हणजे दरवर्षी मनसेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम हा मुंबईत होत असतो. मात्र, यावेळी होणारा कार्यक्रम हा पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच याठिकाणी होत आहे. त्यामुळे पुण्यात होणाऱ्या या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं सर्वांचे लक्ष लागलं आहे. दरम्यान, पुढच्या काही दिवसात महानगर पालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, सर्वच पक्षांनी पालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश देणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. वर्धापन दिनानिमित्त आज होणाऱ्या मेळाव्याची जय्यत तयारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यात केली आहे. मुंबई बाहेर प्रथमच पुण्यात वर्धापन दिन होत असल्याने या मोळाव्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. दरम्यान, आज राज्याच्या विविध भागातून मनसैनिक पुण्यात येणार आहेत. या मेळाव्याच्या ठिकाणी 4 वाजल्यापासून मनसैनिक येणार असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. ज्या ठिकाणी सभा होणार आहे, त्याठिकणी येणार्‍या महिला पांढरा फेटा घालणार आहेत. तर भगव्या साड्यामध्ये महिला सहभागी होणार आहेत. मुंबईच्या बाहेर पहिलाच मेळावा होणार आहे. त्यामुळे पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व जय्यत तयारी केली असल्याची माहिती मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी दिली. कोरोना काळातानंतर मनसेचा हा पहिलाच मोठा कार्यक्रम आहे. या मेळाव्यासाठी पुण्याच्या बाहेरुन मुबंई,  सातारा, सांगली, धुळे, जळगाव औरंगाबाद यासह महाराष्ट्रातून कार्यकर्ते पुण्यात येणार आहेत. साधारणत 8 ते 10 हजार मनसैनिक पुण्यात येणार असल्याची माहिती वसंत मोरे यांनी दिली. दरम्यान, 9 मार्च 2006 शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नवीन पक्षाची स्थापना केली. आत्तापर्यंतच्या वाटचालीत मनसेनं अनेक चढउतार पाहिलेत. पक्षाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 13 आमदार निवडून आले होते. त्यानंतर मात्र मनसेला असं यश मिळालं नाही. सभांना गर्दी खेचणाऱ्या राज ठाकरेंना या गर्दीचं रुपांतर मतांमध्ये करता आलं नाही. मनसेचं प्रभावक्षेत्रही मुंबई आणि काही प्रमाणात नाशिकपलीकडे विस्तारलं नाही. त्यामुळे पक्ष संघटना वाढवण्याच्या दृष्टीने रज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागणार आहे.
   


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply