Pimpri : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, धर्म सोडून वागल्यास सृष्टी…

Pimpri : धर्माच्या आधारे जीवनाची रचना होते. सर्वांचे रक्षण करणे हे धर्म शिकवतो. सृष्टी धर्माच्या आधारे चालते. धर्म सोडून वागलो तर सृष्टी संपेल. सत्य, करुणा, सुचिता, तपस हे धर्माचे चार स्तंभ आहेत. धर्माला तोल असतो. सर्वांना जोडणारा, उन्नती करणारा धर्म आहे. धर्मामुळे अतिरेक होत नाही. धर्म अतिवादाला थारा देत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि चिंचवड ग्रामस्थांच्या वतीने आयोजित श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे उद्घाटन डॉ. भागवत यांच्या हस्ते मंगळवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांतसंघचालक नानासाहेब जाधव, महापालिका आयुक्त शेखर सिंह, देवस्थानचे विश्वस्त जितेंद्र देव, ॲड. राजेंद्र उमाप यावेळी उपस्थित होते.

डॉ. मोहन भागवत म्हणाले, चिंचवडचे स्थान पवित्र आणि जागृत आहे. येथे मोरया गोसावी यांना साक्षात्कार झाला. या ठिकाणाहून ऊर्जा मिळते. या स्थानाला इतिहास लाभला आहे. श्री संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श झाला आहे. ज्यांचे शासन आदर्श मानले जाते, अशा शासनकर्त्यांचा सतत पाठिंंबा मिळत राहिला आहे. समाज सुस्थितीत राहावा, समाजात नीतिमत्ता वाढावी, सत्तेने समाजकारण करावे, सर्वांचे कल्याण करणारी सत्ता असावी, असा आदर्श ज्यांच्या डोळ्यांपुढे होता, त्यांचा या संस्थानशी ऊर्जा प्राप्त करण्याचे स्थान म्हणून संबंध आला आहे.

जग खोटे नाही. जग एका मर्यादेपर्यंत असून परिवर्तनशील आहे. परिस्थिती येते आणि जाते. परिस्थिती बदलत जाते. परिस्थिती चांगली आणि वाईटही येते. सत्य, शास्वस्त हे तत्त्व असून ते कायम राहील. प्रत्येकाचा प्रत्येकाशी संघर्ष आहे. जगाची मांडणी आणि वागण्याची धाटणी संघर्षावर आधारित आहे. संघर्षातून जग पुढे जाते असे सांगत डॉ. भागवत म्हणाले, माणसाने समूह, सृष्टीसोबत माणुसकीने वागले पाहिजे. धर्म एकत्वाचा आधार देतो. धर्म सत्याचा मार्ग आहे. निरनिराळे अनुभव घेऊन जग सुद्धा हा मार्ग आपल्याला मिळेल या आशेने भारताकडे पाहत आहे. काळाचे चढउतार, आक्रमनातून भारतातील सनातन परंपरा जशीच्या तशी उपलब्ध आहे. याचा उपयोग करून आपण पुढे जाऊ शकतो. महापुरुषांचे चरित्र स्मरून आपण त्यांच्याप्रमाणे वागले पाहिजे. धर्म जागरणासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply