शेखर गुप्ता यांचा कॉलम:युद्धात आपल्या उद्दिष्टांबद्दलची स्पष्टता जास्त महत्त्वाची असते

ऑपरेशन सिंदूरच्या 88 व्या तासाला भारताने युद्धविराम करण्याची पाकिस्तानची विनंती मान्य करण्यात घाई केली होती की शहाणपण दाखवले होते? भारताने लढाई सुरू ठेवायला हवी होती का आणि ती कधीपर्यंत? अशा प्रकारचे प्रश्न अलीकडेच तेव्हा उपस्थित झाले, जेव्हा या ऑपरेशनवर स्वित्झर्लंडच्या एका संस्थेच्या ‘सेंटर फॉर मिलिटरी हिस्ट्री अँड पर्सपेक्टिव्ह स्टडीज’साठी एका उच्चाधिकार गटाचा सविस्तर अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालातील निष्कर्षांचे भारतात स्वागत झाले आहे. अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानच्या दाव्यांच्या तुलनेत भारताचे हवाई सुरक्षेमध्ये निम्मेच नुकसान झाले. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे, युद्धविराम होईपर्यंत भारतीय हवाई दलाने शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे मोठे नुकसान केले होते आणि या संघर्षाचा शेवट पाकिस्तानी हवाई दलाच्या मुख्य तळांवर सलग अनेक जबरदस्त हल्ले करून करण्यात आला. अशा प्रकारे, हवाई हल्ल्यात स्पष्ट सरशी मिळवून भारताने पाकिस्तानला युद्धविरामाची विनंती करण्यास भाग पाडले. अहवालात असेही म्हटले आहे की, 10 मे 2025 च्या सकाळपर्यंत भारतीय हवाई दल पाकिस्तानी हवाई क्षेत्राच्या मोठ्या भागावर वर्चस्व मिळवण्यात यशस्वी झाले होते, असे दर्शवणारे पुरेसे पुरावे समोर आले आहेत. यामुळे भारताला शत्रूच्या पायाभूत सुविधांवर लांब पल्ल्यावरून हल्ले करत राहण्याच्या स्थितीत आणले होते. या अहवालाचे निष्कर्ष पाश्चात्त्य ‘थिंक टँक’कडून आलेल्या अहवालांच्या तुलनेत अधिक निष्पक्ष आणि स्पष्ट वाटतात. यामध्ये असेही म्हटले आहे की, 6/7 मे च्या रात्री पीएएफ बहावलपूर किंवा मुरिदकेवरील भारताच्या हल्ल्यांमध्ये अडथळा आणण्यात किंवा ते रोखण्यात यशस्वी ठरले नव्हते. अशा वेळी दोन प्रश्न लगेच समोर येतात. एक प्रश्न संशयवाद्यांकडून येतो, जे विचारतात की, आयएएफ आपल्याच क्षेत्रातून आतून हल्ले करत असताना त्यांनी हवाई क्षेत्रावर वर्चस्व मिळवले होते असे आपण म्हणू शकता का? परंतु वास्तव हे आहे की, आज बहुतेक युद्धे आणि विशेषतः हवाई युद्धे लांब पल्ल्यावरून लढली जात आहेत आणि तुम्हाला शत्रूच्या क्षेत्राच्या आतच काय, तर त्याच्या जवळ जाण्याचीही गरज नसते. दुसरा आणि मोठा प्रश्न तो आहे, जो आपण आधीच उपस्थित केला होता की, भारताने युद्धविराम खूप आधीच स्वीकारला का? अनेक गंभीर लोकही युद्धविरामाला घाईने घेतलेला निर्णय मानतात आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याची जी संधी मिळाली होती, ती गमावली गेल्याबद्दल खेद व्यक्त करतात. याच्या उत्तरात असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की, भारत आपला विजय कशा प्रकारे परिभाषित करणार होता आणि तो विजय कधी झाला असता? तो पीएएफच्या संपूर्ण विनाशाने झाला असता का? की 1971 मध्ये ढाक्यामध्ये जे झाले होते, तसे काही झाल्यावर तो विजय मानला गेला असता? 10 मेच्या संध्याकाळपासून भारत सांगत आला आहे की त्याची उद्दिष्टे पूर्ण झाली होती, युद्धात वर्चस्व त्याला मिळाले होते आणि युद्ध कधी थांबवायचे हे त्याच्या हातात होते. कोणत्याही युद्धाची व्याख्या प्रामुख्याने ते सुरू करणाऱ्या पक्षाच्या उद्दिष्टांवरूनच केली जावी. हा प्रश्न अटलबिहारी वाजपेयी यांनीही तेव्हा उपस्थित केला होता, जेव्हा जानेवारी 2002 मध्ये ‘ऑपरेशन पराक्रम’ अंतर्गत सीमांवर लष्कराची तैनाती उच्च पातळीवर होती. देशाचा मूड पूर्णपणे तापलेला होता आणि तो आरपारच्या लढाईची मागणी करत होता. युद्ध हा पूर्णपणे राजकीय विषय असतो. तो ना भावनिक असतो, ना पूर्णपणे लष्करी. उद्दिष्टांची स्पष्टता नसल्यामुळे भारत ऑपरेशन पराक्रममध्ये अडकून राहिला होता. लष्कर पूर्णपणे तैनात करण्यात आले होते आणि ते दहा महिने ठाम राहिले. अखेरीस, काहीही साध्य न होता, थकल्यामुळे ते छावण्यांमध्ये परतले. भारताने तेव्हा एक संधी गमावली होती का? 1999 आणि 1971 मध्ये आपण स्पष्ट उद्दिष्टे ठेवली होती - कारगिलमधील पाकिस्तानच्या ताब्यातील क्षेत्र मुक्त करणे आणि बांगलादेशला स्वतंत्र करणे. 1999 मध्ये लढाई एलओसीच्या पलीकडे नेण्यासाठी लष्कराकडून जो दबाव होता, त्यासमोर वाजपेयी झुकले नाहीत. 1971 मध्ये पाकने पूर्वेकडे आत्मसमर्पण केले, तेव्हा इंदिरा गांधींनी पश्चिम सेक्टरमध्ये तातडीने युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला होता. काही वर्तुळात हा शाश्वत वाद आणि खेद कायम आहे की इंदिराजींनी पश्चिम सेक्टरमध्ये ‘काम’ फत्ते केले नाही. परंतु त्यांच्यासमोर उद्दिष्टे स्पष्ट होती आणि त्यांनी 13 दिवसांच्या लढाईनंतर विजयाची घोषणा केली. युद्ध ही इतकी गंभीर बाब आहे की ती लष्करी जनरल्सवर सोडून चालत नाही. हा निर्णय राजकीय नेत्यांवर सोडला पाहिजे, जे परिस्थितीच्या व्यापक कॅनव्हासवर लक्ष ठेवून असतात.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) युद्ध कधी सुरू करायचे हे जितके महत्त्वाचे असते, त्यापेक्षा ते केव्हा, कधी व कसे संपवायचे हे समजणेही महत्वाचे आहे. युद्ध ही एक गंभीर बाब आहे जी केवळ सेनापतींच्या भरवशावर सोडता येत नाही.

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

3 thoughts on “शेखर गुप्ता यांचा कॉलम:युद्धात आपल्या उद्दिष्टांबद्दलची स्पष्टता जास्त महत्त्वाची असते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *