पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील नीचांकी तापमान; दोन दिवसांनंतर ढगाळ वातावरण

पुणे : पुणे शहरात शुक्रवारी (११ नोव्हेंबर) सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली. शहरात १२.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेल्याने शुक्रवारीही पुणे राज्यातील सर्वात थंड शहर ठरले. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार १३ नोव्हेंबरपासून शहरात अंशत: ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्रीच्या किमान तापमानात किंचित वाढ, तर दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश भागात सध्या किमान तापमानात मोठी घट असल्याने रात्री गारवा जाणवतो आहे. पुणे शहर आणि परिसरात यंदाच्या हंगामात चार वेळा राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. ३० ऑक्टोबरला शहरात १२.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. यंदाच्या हंगामातील पुण्यातील हे नीचांकी तापमान ठरले. त्याच दिवशी हे तापमान राज्यातही नीचांकी होते. त्यानंतर ३ नोव्हेंबरला १३.१ अंश सेल्सिअस राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. गुरुवारी (१० नोव्हेंबर) पुण्यात १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान पुन्हा राज्यातील नीचांकी तापमान ठरले. त्यानंतर शुक्रवारीही सलग दुसऱ्या दिवशी १२.८ अंश सेल्सिअस राज्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद शहरात झाली. हे तापमान सरासरीच्या तुलनेत २.९ अंशांनी कमी होते.

शहरात सध्या दिवसाचे कमाल तापमान ३० ते ३१ अंशांच्या आसपास नोंदविले जात आहे. त्यामुळे उन्हाचा हलका चटका आहे. मात्र, कमाल तापमान काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील राज्यांत सध्या पावसाळी स्थिती आहे. त्याचा परिणाम राज्याच्या काही भागांवर होणार आहे. पुण्यात १३ नोव्हेंबरपासून अंशत: ढगाळ वातावरण तयार होणार आहे. त्यातून रात्रीच्या किमान तापमानात किंचित वाढ होऊन गारवा कमी होईल. दिवसाच्या कमाल तापमानात घट होऊन उन्हाचा चटकाही कमी होण्याची शक्यता आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *