एन. रघुरामन यांचा कॉलम:करिअरची निवड एखाद्या ध्येयहीन युद्धासारखी नसावी

तो हॉलीवूडमधील कोणताही बॉक्स ऑफिस विश्लेषक नाही, तर हायस्कूलचा एक वरिष्ठ विद्यार्थी आहे. पण आपण मोठे होऊन काय व्हायचे, हे त्याला पक्के ठाऊक आहे. त्याला चित्रपटसृष्टीत जायचे आहे. अभिनय, दिग्दर्शन किंवा संगीत नाही, तर त्याचा रस ‘फिल्म डिस्ट्रिब्युशन’ (चित्रपट वितरण) क्षेत्रात आहे. अबदी बूटानला वाटते की या क्षेत्रात पैसा लवकर कमावता येऊ शकतो.तर सध्या अबदी काय करत आहे? फावल्या वेळात अबदी बॉक्स ऑफिसच्या अंदाजांची स्वतःची ‘स्प्रेडशीट’ तयार करतो. त्याचे अंदाज आगाऊ तिकीट विक्री आणि अशा अनेक घटकांवर आधारित असतात, ज्यात ‘जेन झी’ चा प्रतिनिधी म्हणून त्याला वाटते की, त्याच्या वयाच्या लोकांना एखादा चित्रपट किती आकर्षक वाटेल. बॉक्स ऑफिसचे हे गणित त्याला चित्रपट उद्योग, लोकसंख्येचा विस्तार, भूगोल, जगाची आवड, तांत्रिक कौशल्य, पटकथा लेखनाचे विचार आणि चित्रपटाच्या संगीताची समज देते. असे नाही की पहिल्या दिवसापासून त्याचे अंदाज अचूक ठरले. त्यानेही चुका केल्या, पण स्प्रेडशीटवर काम करणे सुरूच ठेवले नोव्हेंबर 2025 मध्ये हॉलीवूडमध्ये ‘वीकेंड : फॉर गुड’ आणि ‘झुटोपिया 2’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. पहिल्या चित्रपटाच्या तिकीट विक्रीचा त्याने गरजेपेक्षा जास्त अंदाज वर्तवण्याची चूक केली. पण दुसऱ्या चित्रपटाबद्दल त्याने भाकीत केले होते की, हा चित्रपट जगभरात 1.8 अब्ज डॉलर्स कमाई करेल आणि प्रत्यक्षात त्या चित्रपटाने 1.9 अब्ज डॉलर्स कमावले. चित्रपटप्रेमी ‘जे’ युवक आता बॉक्स ऑफिस कलेक्शनवर अधिक लक्ष देऊ लागले आहेत आणि त्यांना हे जाणून घ्यायचे असते की त्यांचे आवडते चित्रपट यशस्वी होतील की नाही. जेव्हा त्यांना कळते की चित्रपट चांगली कमाई करत आहे, तेव्हा कुठेतरी त्यांच्या मनात ही भावना येते की त्यावर केलेला खर्च सत्कारणी लागला. नवल नाही की, या व्यवसायातील आकडेवारी तपासणाऱ्या अनुभवी लोकांसोबतच आजचे तरुणही अबदीच्या गणितावर लक्ष ठेवून असतात. मला अबदीबद्दल वाचलेल्या या गोष्टी तेव्हा आठवल्या, जेव्हा मी एका तरुण पदव्युत्तर पदवीधराचा ‘रेझ्युम’ पाहत होतो. त्याने पाच वर्षांत तीन वेगवेगळ्या क्षेत्रांत काम केले होते आणि आता तो चौथ्या अशा क्षेत्रात करिअर शोधत होता, ज्याचा त्याच्या शिक्षणाशी कोणताही संबंध नव्हता. जेव्हा त्याला विचारले गेले की या तीन क्षेत्रांतून त्याने काय शिकले, तेव्हा त्याच्याकडे कोणतेही ठोस उत्तर नव्हते. आपल्या कामांच्या संदर्भात तो एकही समान दुवा शोधू शकला नाही, कारण तसे काही नव्हतेच. तो करिअर घडवत नव्हता, तर योगायोगाने घडणाऱ्या घटनांमध्ये फक्त दिवस ढकलत होता. कोणत्याही दीर्घकालीन ध्येयाशिवाय करिअर निवडणे म्हणजे उद्देशाशिवाय युद्ध पुकारण्यासारखे आहे. ज्याप्रमाणे एखादा आक्रमक देश कोणत्याही क्षणी स्वतःला विजयी घोषित करू शकतो, तसाच एखादा तरुणही आपल्या रेझ्युमेमध्ये लिहू शकतो की त्याला ‘अ, ब, क अशा अनेक ठिकाणचा अनुभव आहे.’ पण इतकी वर्षे त्याने या क्षेत्रांत का घालवली, हे तो समजावून सांगू शकत नाही. शालेय दिवसातच ‘स्प्रेडशीट्स’ वर काम करणे हे दर्शवते की, तुम्ही त्याकडे केवळ एक छंद म्हणून नाही, तर भविष्यातील यशाचे ‘डेटा पॉइंट्स’ म्हणून पाहत आहात. तुमचे पहिल्या दिवसापासून बरोबर असणे आवश्यक नाही. तुम्ही चुका करू शकता, ज्या तुमच्यासाठी धडा ठरू शकतात. यश मिळायला वेळ लागू शकतो. तुमच्या आयुष्याचे ‘बॉक्स ऑफिस’ पहिल्याच वर्षी अब्जावधी डॉलर्सपर्यंत पोहोचणार नाही, पण जर तुम्ही लवकर सुरुवात केली आणि त्यात सातत्य ठेवले, तर तुम्हाला ‘हायरिंग मॅनेजर’समोर कधीही अशा स्थितीत उभे राहावे लागणार नाही, जिथे तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचलात हे सांगता येणार नाही. तुम्हाला कधीही तात्पुरत्या नोकरीशी तडजोड करावी लागणार नाही, कारण तुम्ही स्वतः उद्योग चालवण्यात व्यस्त असाल. फंडा असा आहे की, अबदीप्रमाणे लवकर करिअर निवडा आणि शालेय जीवनापासूनच त्यावर काम सुरू करा. स्पष्ट उद्दिष्टाशिवाय वाटेत येणाऱ्या प्रत्येक करिअरमध्ये भटकत राहणे अनुभवी नाही, तर परिस्थितीने गांजलेले बनवते.

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *