फौजिया खान यांचे पंतप्रधानांना थेट निवेदन

विविध खासदार प्रश्न विचारत आहेत व मंत्री उत्तरे देत आहेत. त्याच वेळी विरोधी पक्षातील एक खासदार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आसनाजवळ येतात व त्यांच्याशी बोलून निवेदन त्यांच्याकडे देतात. हे दृश्य पाहून सत्तारुढ सदस्यांच्या चेहऱ्यावर अवाक् झाल्याचे भाव उमटतात. मात्र पंतप्रधान या खासदारास हसून प्रतिसाद देतात. जे सत्तारुढ मंत्र्यांनाही शक्य होत नाही ते काम करणाऱ्या महाराष्ट्रातील या खासदाराचे नाव होते डॉ. फौजिया खान.

दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या बालकांवरील उपचारांसाठी केंद्राने निधीची तरतूद करावी, यासंदर्भात निवेदन देऊन त्याबाबत चर्चा करण्यासाठी डॉ. खान यांनी पंतप्रधानांची वेळ मागितली. आपण लवकरच वेळ देऊ असे पंतप्रधानांनी सांगितल्याचे डॉ. खान यांनी ‘सकाळ’ला सांगितले. २०१४ नंतर सभागृहाचे कामकाज सुरू असताना एखाद्या खासदारांनी त्यातही विरोधी पक्षीय थेट भेटण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे. डॉ. खान यांनी दिलेले निवेदन मोदी यांनी संपूर्ण वाचले. या मुद्यावर वेळ हवा आहे, असे सांगितले आणि पंतप्रधानांनीही सहजपणे संवाद साधल्याचे डॉ. खान यांनी सांगितले.

बालकांना होणारे दुर्धर आजार व त्यावरील महागडे उपचार या मुद्यावर सर्वपक्षीय २५ खासदारांनी एक गट (सपोर्ट ग्रुप) बनविला आहे. यात डॉ खान यांच्यासह डॉ. शांतनू सेन, कुमार केतकर, अॅमी याज्ञिक, नीरज डांगी, अब्दुल वहाब, मनोज झा, छाया वर्मा आदींचा समावेश आहे. याबाबतचे निवेदन डॉ. खान यांनी पंतप्रधानांच्या हाती सोपविले. देशभरात अशी हजारो बालके दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. या उपचारांसाठी येणारा कोट्यवधी रूपयांचा खर्च त्यांच्या पालकांना परवडणारा नाही. त्यामुळे केंद्र सरकारने यासाठी वेगळी आर्थिक तरतूद करावी किंवा या बालकांवरील उपचारांसाठी एक व्यवस्था निश्चित करावी, अशी विनंती पंतप्रधानांना या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

भाजपचे अजूनही स्पष्ट बहुमत नसलेल्या राज्यसभेत पंतप्रधान मोदी आठवड्यातून एकदा गुरूवारी फक्त प्रश्नोत्तर तासातच येतात. या वरिष्ठ सभागृहात तीन आजी-माजी पंतप्रधान एका वेळी उपस्थित असण्याचे प्रसंग काही वेळा येतात. आज कामकाज सुरू असतानाच माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा सभागृहात आले. कामकाज संपल्यावर मोदी यांनी त्यांच्याजवळ जाऊन प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर काँग्रेसच्या बाकांकडे जाणार असे वाटत असताना मोदींनी विरोधी पक्षनेत्यांसह कॉंग्रेस नेत्यांकडे पाहून हात जोडले आणि ते सभागृहाबाहेर पडले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply